कला शिक्षिका आश्विनी जाधव यांनी तब्बल १० तासांच्या अथक प्रयत्नातून साकारली भव्य-दिव्य रांगोळी..!!
"साईनगरीत रंगली भक्ती व कलेची जुगलबंदी" माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला सन्मान..!!
पंडित प्रदीप मिश्रा यांचे व्यक्तिचित्र, शिव-पार्वतीचे दर्शन आणि भक्तीचा आविष्कार भाविकांना मंत्रमुग्ध करतोय..!!
रांगोळी कलाकार अश्विनी जाधव यांनी तब्बल १० तासांच्या प्रयत्नातून साकारली ८x८ फूट भव्य रांगोळी.
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार ता.१५/१०/२०२५
अहिल्यानगर (शिर्डी) : अस्तगाव फाटा (पिंपरी निर्मळ) येथे १२ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक शिवमहापुराण कथेच्या भक्ती उत्सवात महाराष्ट्रभरातून भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या भक्तीमय वातावरणात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे सभामंडपातील भव्य रांगोळी कलाकृती भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली आहे.
"शिवमहापुराण कथेच्या सभामंडपातील ८x८ फूट रांगोळीसमोर कलाकार अश्विनी राजेंद्र झावरे जाधव समवेत माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील."
सुबक आणि आकर्षक रांगोळी प्रवारानगर लोणी येथील मूळ रहिवासी व सध्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथील तळेगाव मध्ये स्थायिक असलेल्या कला शिक्षिका अर्थात रांगोळी कलाकार अश्विनी राजेंद्र झावरे- जाधव यांनी साकारली आहे. वेळे अभावी त्यांनी रात्रभर जागून तब्बल १० तासांच्या अथक परिश्रमातून ही रांगोळी पूर्ण केली. तिचे आकारमान ८ फूट लांबी व ८ फूट रुंदीचे असून, ती कलात्मकतेचा आणि भक्तीचा सुरेख संगम ठरत आहे.
रांगोळीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे जिवंत भासणारे व्यक्तिचित्र, शिव-पार्वती म्हणजेच शिवशक्तीचे दर्शन, तसेच महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करणाऱ्या भक्त स्त्रीचे दृश्य अत्यंत देखण्या पद्धतीने साकारले आहे. ही कलाकृती पाहताना भाविकांना जणू देवाधिदेव महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याचा अनुभव मिळतो.
ही रांगोळी मुख्य सभामंडपात असल्याने तिचे दर्शन सहज घडते. भक्तगण रांगोळी पाहण्यासाठी रांगा लावत आहेत आणि आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात तीचे छायाचित्र टिपताना दिसतात. या मनमोहक व भक्तीमय रांगोळीने सभामंडपाचे सौंदर्य खुलवले आहे.
"या उत्कृष्ट कलाकृतीचे कौतुक करत माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्वतः सभामंडपात येऊन रांगोळीचे दर्शन घेतले. त्यांनी कलाकार अश्विनी राजेंद्र झावरे जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये योगिता जाधव, शिवानी जाधव, गार्गी जाधव, राजेंद्र जाधव आणि शामराव रहाणे यांच्याशी संवाद साधला. सुजय विखे यांनी या उत्कृष्ट कलाकृतीचे मनापासून कौतुक करत अश्विनीताईंचा सन्मान आणि अभिनंदनही केले."
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600