शिरूर,प्रतिनिधी:
राज्य महामार्ग क्रमांक १०३ राजगुरुनगर शिरूर रस्त्यावर कनेरसर(गोगावले वस्ती) ते पाबळ ५.५ कि.मी रस्त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्ता खराब झालेला आहे . खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही .त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, वाहने चालवावी लागतात. या रस्त्याने शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्यामुळे त्यांना देखील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेकांना प्राण गमावावे लागले असून अपघात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे.
यासाठी कनेरसर, पुर, वरुडे, पाबळ या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन यमाई माता ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून भव्य "रस्ता रोको आंदोलन" रविवार दि. ९नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते१ या वेळेत करण्यात आले.
आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील, अबाल वृद्ध, महिला, तरुण, मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलन स्थळी कनेरसर चौकात रस्त्यावर बसून तीव्र निषेध व्यक्त केला. या ठिकाणचा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा!, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा!, जय जवान जय किसान!, ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो!, कनेरसर -पाबळ रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे! असा घोषणांचा जयघोष आंदोलन स्थळी चालू होता.
आंदोलनाच्या कालावधीत अनेक नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि कनेरसर (गोगावले वस्ती)ते पाबळ हा रस्ता तात्पुरती डाग डुगी न करता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा चांगला रस्ता झाला पाहिजे. अशी एक मुखाने मागणी करण्यात आली.
आंदोलनाच्या वेळेस बाळासाहेब खरपुडे, जयवंतराव दौंडकर, सत्यवान दोंडकर, प्रा. बाळासाहेब माशेरे, प्रतीक दौंडकर, हुसेन इनामदार, संदीप गावडे, अभिजीत नाईकरे, उमेशदौंडकर, रंगनाथ दौंडकर, संतोष दौंडकर यांची रस्ता प्रश्न संदर्भात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या
आंदोलनामुळे खेड- पाबळ रस्त्यावर वाहनाच्या लांब रांगा लागलेला होत्या.
आंदोलन खूप वेळ चालू असूनही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नव्हत्या त्यामुळे आंदोलक चिडल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलन स्थळे बांधकाम विभागाचे अधिकारी आल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही असा पवित्र घेतल्याने बांधकाम विभागाकडून श्री. सोनवणे ( उपअभियंता) यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्वीकारले. त्यांनी लवकरच प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचा व कायमस्वरूपी चांगला रस्त्या करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
यापुढे जर दिलेल्या आश्वासन पाळले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

