प्रतिनिधी – एरंडोल पालिका निवडणुकीत माघारीची धूळ बसताच आता वास्तविक लढतींचे चित्र उघडे पडले आहे. काही प्रभागांत जुने चेहरे पुन्हा मैदानात उतरले असले तरी मोठ्या प्रमाणात नव्या उमेदवारांनी रिंगणात झेपावत निवडणूक रंगवली आहे. काही ठिकाणी बंडखोरांचा जोर स्पष्ट दिसत असून, काही भागात आघाडीचे उमेदवार मजबूत उभे असल्याचे चित्र तयार झाले आहे.
दरम्यान, अनेक प्रभागांत पती–पत्नी, नातेवाईक आणि घरातील सदस्य एकाच वेळी निवडणुकीत उतरल्याने चुरस अधिक गडद झाली आहे. पक्षपदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय रिंगणात असल्याने राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून विजयी समीकरणे अनेक ठिकाणी गुंतागुंतीची बनली आहेत.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून डॉ. नरेंद्र ठाकूर हे व्यासपीठावर असून त्यांची पत्नी, माजी उपनगराध्यक्षा डॉ. गितांजली ठाकूर या प्रभाग क्रमांक २-अ मधून मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गायत्री दीपक पाटील नगराध्यक्षपदाची लढत लढत असून त्यांच्या पती दीपक नामदेव पाटील हे प्रभाग क्रमांक ५-ब मधून निवडणुकीस उतार आहेत.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील (प्रभाग ५-ब) तसेच त्यांची पत्नी (प्रभाग १-अ) यांनीही जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन (प्रभाग ६-अ) व त्यांची पत्नी मंगला महाजन (प्रभाग ४-ब) अपक्ष म्हणून लढत असल्याने या प्रभागातही वेगळे समीकरण उभे राहिले आहे.
अपक्ष उमेदवार दर्शना विजय ठाकूर नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असून त्यांच्या नणंद व अहिराणी सिने अभिनेत्री पुष्पा ठाकूर या प्रभाग क्रमांक २-अ मधून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देत आहेत.
प्रभाग क्रमांक ४-अ मध्ये माजी उपनगराध्यक्ष कुणाल रमेश महाजन (शिवसेना) व त्यांचे चुलत बंधू प्रशांत दिलीप महाजन (अपक्ष) आमनेसामने उभे राहिल्याने कुटुंबातील राजकीय तणावही समोर येत आहे. प्रभाग ३-अ मध्ये माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे (शिवसेना) तर त्यांचे मामे भाऊ अमोल तांबोळी (प्रभाग २-ब) अपक्ष म्हणून लढत आहेत.
याशिवाय भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन यांच्या पत्नी आरती देवरे या भाजपकडून, पौर्णिमा देवरे शिवसेनेकडून, माजी उपनगराध्यक्ष गणेश मराठे ठाकरे गटाकडून, माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन अपक्ष, तर माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील शिवसेनेकडून मैदानात असल्याने प्रभागात अनेक बाजूंनी टक्कर रंगत आहे.
प्रभाग क्रमांक १, ३, ५, ७ व ११ मध्ये सरळ लढत तर उर्वरित प्रभागांत तिरंगी–चौरंगी संघर्ष होत असून भाजप–शिवसेनेत काही ठिकाणी बंडखोरांनी अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
नगराध्यक्षपदाची चुरसही तितकीच तीव्र असून महायुती–महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष उमेदवार हे समीकरण बदलू शकणारे निर्णायक घटक ठरत आहेत. महायुतीकडून सभा, मेळावे व गृहभेटींना गती मिळाली असून महाविकास आघाडीनेही थेट जनसंपर्क मोहिमेत ताकद झोकून दिली आहे. अपक्ष उमेदवारांनाही गृहभेटींचा आधार लाभत असल्याने निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिक चैतन्यमय होत आहे.

