पारनेर | प्रतिनिधी | शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सा.उपविभाग, पारनेर येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता बोके यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शासकीय बांधकाम कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप पुढे आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित शाखा अभियंता अनेक वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातच सलग कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या बदली धोरणाचा भंग करून एकाच जिल्ह्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे ठेकेदारांशी जवळीक वाढून गैरप्रकारांना खतपाणी मिळाल्याचा आरोप होत आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, मोजमाप पुस्तिका (MB), बिल मंजुरी व कामाच्या दर्जा प्रमाणपत्रांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून शासनाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा संशय आहे. त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत चल व अचल संपत्तीत असामान्य वाढ झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ विभागीय चौकशी न करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) खातेनिहाय सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे. तसेच चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी शाखा अभियंता बोके यांची तात्काळ अहिल्यानगर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
जर हे आरोप खरे ठरले, तर हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गंभीर गुन्हा ठरू शकते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून तात्काळ कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
❓ ACB चौकशी होणार की बदलीविना प्रकरण दाबले जाणार?
हा प्रश्न सध्या पारनेर व अहिल्यानगरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
— शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह

