अकोले ( प्रतिनिधी ): ४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोलेची कन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद हिने सुवर्णपदक पटकावले आहे.
१४ ते १८ डिसेंबर २०२५ पासून पश्चिम बंगालमधील दत्तापुलिया येथे वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल आयोजित केली आहे. या स्पर्धेचे आयोजन सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि पश्चिम बंगाल सॉफ्टबॉल असोसिएशन यांनी केले आहे.
या स्पर्धेत देशभरातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिला खेळाडू त्यांची ताकद, कौशल्य आणि सांघिक भावना दाखवतात. या स्पर्धेत फिजा सय्यद हिने उत्कृष्ठ कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे.
फिजा सय्यद ही नगर जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ व आदिवासी तालुक्यातील कन्या असून अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सन 2013 पासून सॉफ्टबॉल या खेळामध्ये सातत्याने सहभाग असून तालुकास्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध स्पर्धांमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतला आहे. सन 2017 मध्ये 24 वी सीनियर महाराष्ट्र सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा मुंबई सिटी सॉफ्टवेअर असोसिएशन मुंबई या स्पर्धेमध्ये रनरअप मिळाले. सन 2018 मध्ये 24 वी जूनियर नॅशनल महाराष्ट्र राज्य सॉफ्ट बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळाले. सन 2018 - 2019 मध्ये 36 वी जूनियर नॅशनल सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा चित्तूर (आंध्र प्रदेश) मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठा वाटा होता. सन 2018 मध्ये इंडियन टीम ऑफ अंडर 19 मध्ये सातव्या एशियन ज्युनिअर वूमन सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप क्लार्क फिलिपिन्स येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शन केले. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 मध्ये एशियन वुमन युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप, पटाया, थायलंड येथे भारतीय संघाकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
आजपर्यंत क्रीडा सामाजिक राजकीय शैक्षणिक राष्ट्रीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार तिला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मिळाला आहे.

