इंग्लंड क्रिकेट संघाने अखेर २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेत आपले खाते उघडले आहे. शनिवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे संघाने ३२.२ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयानंतरही ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी कायम ठेवली आहे. सध्याच्या अॅशेस मालिकेत कसोटी सामना फक्त दोन दिवसांत संपण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, पर्थमध्ये खेळलेला पहिला सामना फक्त दोन दिवसांत संपला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला होता.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडला जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात दिली. त्यांनी ५१ धावांची सलामी भागीदारी केली. बेन डकेट २६ चेंडूत ३४ धावा काढून मिचेल स्टार्कच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. ब्रेकपूर्वी इंग्लंडने ब्रायडन कॉर्सला मैदानात उतरवले. परंतु तो फार काळ क्रीजवर टिकू शकला नाही, त्याने ८ चेंडूत ६ धावा केल्या. सलामीवीर जॅक क्रॉली ४८ चेंडूत ३७ धावा काढून बोलँडद्वारे पायचीत झाला. जेकब बेथेलने ४६ चेंडूत ४० धावा काढल्या. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट रिचर्डसनचा बळी ठरला. पायचीत होण्यापूर्वी रूटने ३८ चेंडूत १५ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही ९ चेंडूत दोन धावा काढून झेलबाद झाला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ३४.३ षटकांत सर्वबाद १३२ धावा केल्या. २२ धावांवर असताना स्कॉट बोलँडच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. बोलँड १७ चेंडूत फक्त ६ धावा करू शकला. जॅकला फक्त ५ धावा करता आल्या. मार्नस लाबुशेनने १८ चेंडूत ८ धावांचे योगदान दिले. ट्रॅव्हिस हेडने ६७ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात ४ चौकार मारले. दुसऱ्या डावात तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.पहिल्या डावात अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा बोलँड दुसऱ्या डावात सलामीला खेळला, हा विश्वविक्रमच म्हणावा लागेल.
बॉक्सिंग डे कसोटीच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट इतिहासातील एक दुर्मिळ कामगिरी झाली, दोन्ही संघांच्या मिळून २० विकेट्स पडल्या. कसोटी क्रिकेटच्या १२३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या अॅशेस मालिकेच्या पहिल्या दिवशी २० किंवा त्याहून अधिक गडी बाद झाले.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याच्या गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियन संघ १५२ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डावही फक्त ११० धावांवर गडगडला. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एकही बळी न गमावता चार धावा केल्या होत्या व त्यांची आघाडी ४६ धावांपर्यंत वाढवली.
सन १९०१- ०२ अॅशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी २० किंवा त्याहून अधिक गडी बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, सन १९०१-०२ अॅशेस मालिकेच्या मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी २५ विकेट्स पडल्या होत्या. सन १८८२, १८९० आणि १९०९ मध्ये अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी २० किंवा त्याहून अधिक विकेट्स पडल्या होत्या, परंतु सर्व इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या गेल्या होत्या. सन १८८२ मध्ये, ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २२ विकेट्स पडल्या तर सन १८९० मध्ये, ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्या. त्यानंतर, १९०९ च्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्या.
या कसोटी दरम्यान, इंग्लंडचा तरुण फलंदाज हॅरी ब्रूकनेही इतिहास रचला. तो त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३,०००+ धावा, ४५+ सरासरी आणि ७०+ स्ट्राईक रेटसह निवडक फलंदाजांच्या गटात सामील झाला. ब्रूक हा सर्वात वेगवान कसोटी फलंदाज आहे. किमान २००० कसोटी धावा करणाऱ्या ३४८ फलंदाजांमध्ये हॅरी ब्रूकचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर बेन डकेटचा क्रमांक लागतो.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने पुन्हा एकदा मेलबर्नमध्ये आपली योग्यता सिद्ध केली. त्याने या मैदानावर आतापर्यंत चार कसोटी सामन्यांमध्ये १३.८९ च्या सरासरीने १९ बळी घेतले आहेत. त्याचे सर्वोत्तम गोलंदाजी आकडे ७/४ आहेत. पहिल्या डावात केवळ ११० धावांवर बाद होणे ही सन २००० नंतर परदेशातील अॅशेस कसोटीतील इंग्लंडची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याबरोबरच या मालिकेत इंग्लंडची खराब फलंदाजी सुरूच राहीली
या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लंडची पराभवाची मालिका थांबली, परंतु मालिका हातची निसटली ती निसटलीच. या विजयामुळे इंग्लंडच्या डब्ल्यूटीसी चक्रातील विजयांची संख्या वाढली असली तरी पुढील प्रवास त्यांच्यासाठी खडतरच आहे. मागील दोन दशकात भारत सोडून इंग्लंड हा बॉक्सिंग डे कसोटीत हरवणारा केवळ पहिला देश बनला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला आणखी धक्का बसला.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

