shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई फाइल्स..,जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मुंबई महानगर पालिका निवडणूक - 2026 निमित्त मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शहरीकरणाचे महत्त्व वाढले आहे याचे कारण, जवळपास निमा महाराष्ट्र हा शहरी बनला आहे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये देखील शहरांचा प्रभाव जाणवतो आहे. १९९५ पूर्वी महाराष्ट्रातले सर्व मुख्यमंत्री हे ग्रामीण भागातील होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यतः शहरातच, म्हणजे कोकणातून मुंबईत आलेल्या आणि वर्षोनुवर्ष मुंबईत राहणाऱ्या मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद देऊन, शहरांना देखील आम्ही महत्त्व देतो, हे अधोरेखित केले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसाठी नितीन गडकरींचे कौतुक केले जाणे स्वाभाविक आहे. परंतु त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या प्रकल्पास प्रोत्साहन होते. एवढेच नव्हे, तर १९९० च्या शिवसेना-भाजप जाहीरनाम्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवे उभारण्याचा संकल्प अंतर्भूत होता. शिवाय युतीच्या काळात हा रस्ता कमी पैशात झाला. शहरी गरिबांसाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना शिवसेनेनेच आणली. त्याचप्रमाणे झुणका भाकर केंद्रेसुद्धा ठिकठिकाणी झाली. या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही हे खरे असले, तरी शहरांचे प्रश्न हाताळण्यास भाजपने नव्हे, तर प्रथम शिवसेनेनेच सुरुवात केली होती. शिवाय शहरांचा विकास म्हणजे केवळ रस्ते नव्हे, तर गोरगरिबांना स्वस्तात जेवण मिळाले पाहिजे, ही सुद्धा शिवसेनेची दृष्टी होती. त्यावेळी फडणवीस हे साधे नगरसेवक होते. ठाण्याचा 'आणि म्हणोन' 'खरे म्हणजे' हा तेव्हा राजकारणात कोणीच नव्हता! त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्याखेरीज विकास होऊ शकत नाही, हा भ्रम आहे.

मनोहर जोशी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत 'बॉम्बे'चे 'मुंबई' करा ही मागणी लावून धरली. नियमानुसार हरकती आणि सूचना मागवल्यानंतर, केंद्रीय गृहखात्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हे उचित होणार नाही, असा आक्षेप घेतला. पण जोशी यांनी मुत्सद्देगिरीने सर्व अडथळे पार करत, 'बॉम्बे' किंवा 'बंबई'ची 'मुंबई' केली.

रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या जोशी यांनी, माधुकरी मागून, वडिलांबरोबर भिक्षुकी करून, नोकरी करत 'कमवा आणि शिका' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणारे जोशी, त्याच महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले. तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवत, नगरसेवकापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. १९७६-७७ या काळात मनोहर जोशी हे मुंबईचे महापौर होते. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५५ उड्डाणपूल बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना ही मनोहर जोशी सरकारने आखली आणि या प्रकल्पाची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपवली होती.

जोशी यांनी मुंबईत कला अकादमीची स्थापना केली आणि राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सुरू केला'. मुंबईत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी जोशी यांनी पुढाकार घेतला. जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून भाषासंवर्धन आणि मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. मनोहर जोशी हे मुंबईचे होते आणि म्हणून त्यांना या नगराच्या समस्यांची चांगली माहिती होती.

 राज ठाकरे यांनी मुंबईबाहेरच्या अनेक नेत्यांना मुंबईची फारशी माहिती नसते आणि त्यात रसही नसतो, अशी टीका अलिकडेच केली होती. 

शहरांतील वाहतूक व पार्किंगच्या समस्या आणि शहरांचा एकूण विकास याबाबत राज ठाकरे कायमच आग्रही भूमिका मांडत राहिले आहेत.
 शिवसेनेचे सुधीर जोशी हे १९७३ साली मुंबईचे महापौर झाले, तर १९७६ साली मनोहर जोशी महापौर बनले.

सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिकेचे गटनेता व विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सुधीरभाऊ महापौर झाले. तेव्हा ते सर्वात तरुण महापौर होते. 

सुधीर जोशींसारखा सज्जन माणूस राजकारणात क्वचितच आढळतो. स्वतःच्या नेतृत्वाचे उसने अवसान न आणता, त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले. सुधीर जोशी हे दादर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष होते, त्यावेळी मी त्या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सुधीर जोशी यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अध्यक्षाच्या रूपाने मुंबईतील सामान्य ग्राहकांचे हितच जपले. एवढेच नव्हे, तर दूध वितरक सेना, विमा कर्मचारी सेना, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना यामध्ये काम करताना सुधीरभाऊंनी मुंबईतील कामगार आणि सामान्यजनांचे प्रश्न सोडवले. साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून देखील सुधीरभाऊंचे काम लखलखित होते.

महाराष्ट्राचे 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' आणि 'विकासपुरुष' व लाडक्या बहिणींचे मामा बनण्याची तिरंगी स्पर्धा सध्या सरकारमध्ये सुरू आहे. देवाभाऊ, एकनाथभाई आणि दादा यांच्यात जाहिरातींची चुरस लागली आहे.
 
श्रेयासाठी धडपड सुरू आहे. अशावेळी जाहिरातींचा मारा न करता, बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील अनेक प्रश्न सोडवले आणि त्यांना मनोहर जोशी, सुधीर जोशी यांच्यासारख्यांची साथ लाभली. अनेक मराठी हॉटेल व अन्य छोट्या व्यावसायिकांना आणि स्टॉलधारकांना व्यवसायात उभे राहण्यासाठी असली शिवसेनेच्याच नेत्यांनी मदत केली. त्यावेळी वर्तमानपत्रांच्या जॅकेट जाहिराती करून, समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा सोस नव्हता. परंतु फडणवीस आणि शिंदे यांच्या शिवायदेखील महाराष्ट्राची प्रगती होत होती आणि त्यात असली शिवसेनेचाच वाटा होता... जनसंघ आणि भाजपचा त्यावेळी विकासाशी संबंध नव्हता. कारण त्यांचा स्वतःचाच विकास व्हायचा बाकी होता! महाराष्ट्राची प्रगती करण्यात यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवार, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत अनेकांचा हातभार लागला आहे. शिवाय आज विकासाच्या नावाखाली झाडे तोडून, टेकड्या फोडून आणि शहरे उखडून, केवळ कंत्राटदारांचा आणि लाडक्या उद्योगपतींचाच विकास केला जात आहे. हे सर्व लक्षात ठेवून महाराष्ट्रातील व मुंबईतील मतदार या भकासपुरुषांना जन्माची अद्दल घडवतील, अशी अपेक्षा आहे!
close