लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना पीएचडी पदवी प्रदान
इंदापूर: लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच व जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. चित्रलेखा श्रीमंत ढोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना डॉ. सौ. ढोले यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. शिक्षणासोबतच राजकारण व समाजकारणाची यथायोग्य सांगड घालून त्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र ज्ञानग्रहणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, या उद्देशाने त्यांनी पीएचडी अभ्यासास सुरुवात केली.
चार वर्षांच्या अथक परिश्रमातून मा. डॉ. साहेबराव हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
“ग्रामीण महिलांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास (विशेष संदर्भ : इंदापूर तालुका, जिल्हा पुणे)”
या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे तालुक्यातील असंख्य महिला व विद्यार्थिनींसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी डॉ. सौ. ढोले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या शैक्षणिक यशप्राप्तीत मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांनी डॉ. सौ. ढोले यांना वेळोवेळी प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील महिला, नागरिक, विद्यार्थी व शिक्षक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

