स्वीकृत नगरसेवक प्रवीण सावरकर यांचा सहपत्नी सत्कार
आमदार उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर यांचे नाभिक समाजाकडून आभार
वरुड / प्रतिनिधी:
नाभिक समाज हा समाजातील एक अविभाज्य घटक असूनही अनेक वर्षांपासून राजकीय प्रवाहापासून उपेक्षित राहिला होता. अल्पसंख्याक समाज असल्यामुळे या समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळत नव्हती. मात्र अमरावती जिल्ह्यातील वरुड–मोर्शी मतदारसंघाचे लोकनेते आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी नाभिक समाजातील एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत समाजाला मुख्य प्रवाहात आणले असल्याची भावना नाभिक समाज बांधवांनी व्यक्त केली.
वरुड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नाभिक समाजातील प्रवीण सावरकर यांची निवड झाल्याबद्दल नाभिक समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सहपत्नी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ही निवड महाराष्ट्रातील नाभिक समाजासाठी ऐतिहासिक असून, प्रथमच सामान्य कुटुंबातील नाभिक समाजाचा कार्यकर्ता स्वीकृत नगरसेवक पदी निवडला गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजाने आमदार उमेश यावलकर यांचे मनापासून आभार मानले.
यावेळी नाभिक दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकृष्णजी शिरूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आमचा नाभिक समाज लहान असला तरी प्रत्येक समाजाच्या सुख-दुःखात आम्ही नेहमी सहभागी होत असतो. आज आमच्याही समाजाला राजकीय क्षेत्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून यासाठी आमदार उमेशजी यावलकर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत.”
संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे राजीव बाभुळकर यांनीही मनोगत व्यक्त करत सांगितले की, नाभिक समाज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. मात्र प्रथमच समाजातील कार्यकर्त्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमदार उमेश यावलकर यांचे सर्व नाभिक समाज बांधव आभारी आहेत.
सत्काराला उत्तर देताना प्रवीण सावरकर म्हणाले, “हा माझा वैयक्तिक सत्कार नसून संपूर्ण नाभिक समाजाचा सन्मान आहे. आमदार उमेशजी यावलकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्यासाठी मी व माझा समाज आयुष्यभर ऋणी राहू. दूरदृष्टी, सर्वधर्मसमभाव आणि विकासाचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे आमदार चंदुभाऊ यावलकर.” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला नाभिक दुकानदार संघटना, संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच वरुड नाभिक महिला संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रामकृष्ण शिरूरकर, राजीव बाभुळकर, रमेश माथुरकर, राजीव मिसळकर, रमेश आसोलकर, राजेंद्र धानोरकर, गणेश आंबुलकर, विष्णू आंबुलकर, उद्धवराव घावरे, सुरेशराव बोरकर, महेंद्रपंत तळखंडकर, माणिकदासजी बेलूरकर, धनराज तळखंडकर, विलास साखरकर, शुभम साखरकर, प्रफुल साखरकर, अशोकराव साखरकर यांच्यासह महिला संघटनेच्या अध्यक्षा वर्षा तळखंडकर, सचिव स्वाती धानोरकर, अंजली चौधरी, पुनम बाभुळकर, नीलम सावरकर व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

