जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
२०२३ च्या जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले, तेव्हा त्यांनी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला होता. परंतु यातील तीन कंपन्या या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि चंद्रपूर जिल्ह्यातील होत्या!
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने वेदांता फॉक्सकाॅन हा १ लाख ५८ हजार कोटी रुपये किमतीचा व एक लाख रोजगार देणारा, तळेगावजवळ सुरू होणारा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला. मिहान येथे होणारा २२००० कोटींचा टाटा एअरबस, रायगडमध्ये होणारा ३००० कोटी रुपयांचा बल्क प्रकल्प व इतर असे एकूण अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकल्प व लाखो रोजगार महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यांत जाऊ दिले होते. त्यामुळे राज्यातील जनतेत संताप होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेदांतपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत, अशी लोणकढी थाप यावेळी शिंदेंनी मारली! तो प्रकल्प त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आलाच नाही... ही नाराजी दूर करून आपण मोठी गुंतवणूक आणली हे दाखवण्याच्या नादात शिंदे सरकारने महाराष्ट्राशी बनवाबनवीच केली.
२०२४ मध्ये शिंदे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा दावोसध्ये गेले. आम्हाला अपेक्षा होती ३ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची, पण ४ लाख कोटी रुपयांचे करार झाले, असे शिंदे म्हणाले. आम्हाला १० लाख कोटींचे करार होतील अशी अपेक्षा होती, पण कमी रकमेचे करार झाले असे म्हटले असते, तर स्वतःच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे झाले असते! म्हणून त्यांनी मुळात आपली अपेक्षा कमी रकमेचीच 'दाखवली.
आता फडणवीस म्हणतात, की त्यांनी दावोसमध्ये पहिल्या दिवशीच १४ लाख कोटी रुपयांचे करार केले. त्यामुळे १५ लाख रोजगार मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. इतक्या गुंतवणुकीत इतकेच रोजगार? अशा प्रकारची भांडवलसघन गुंतवणूक कितपत फायद्याची, यावर चर्चा झाली पाहिजे. असो. पण गुंतवणुकीबाबत आपण शिंदेंवर चांगलीच मात केली आहे, असे संकेत फडणवीस देत आहेत. लोढा यांच्या मुलाच्या कंपनीशी देखील करार करण्यात आला. ही कंपनी महाराष्ट्रात डेटा सेंटर उभारणार आहे. कबुतरखान्यांप्रमाणेच लोढा महाराष्ट्रवरदेखील प्रेम करतात बरे!
२०२३ साली शिंदे ७६ तास दावोस मध्ये होते आणि केवळ चार तास झोपत होते, असा दावा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री हे २८ तास दावोसमध्ये होते. मात्र या २८ तासांत ते महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने दावोसमध्ये काम करत होते, असेही सामंत म्हणाले होते.
आपण एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठावंत आहोत हे सामंत यांना सतत दाखवून द्यावे लागत आहे! मुंबईत सामंत यांचे लोणी प्रसिद्धच आहे... अर्थात तो ब्रँड वेगळा, उदयजींचा ब्रँड वेगळा! उदयजींना दावोसमध्ये फडणवीसांचा अधिक सहवास मिळाला. त्यामुळे शिंदे अस्वस्थ झाले का ते ठाऊक नाही. परंतु अमुकतमुक शहराला एमआयडीसी द्या, असे 'आदेश' ते पालिका निवडणुकांच्या दरम्यान सामंतांना देत होते. याद्वारे सामंत हे आपल्या हाताखाली आहेत, हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न शिंदे करत होते.
सामंत कोणत्याही क्षणी बंड करून भाजपमध्ये जातील, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला उत्तरही सामंत यांनी दिले होते. परंतु सामंत हे सर्वसमावेशक राजकारणी आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस या सर्वांशी उत्तम संबंध प्रस्थापित करून, सतत सत्तेत राहण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला आहे. 'उदयोन्मुख अर्थव्यवस्था' म्हणजेच 'इमर्जिंग इकॉनॉमीज' हा शब्दप्रयोग प्रचलित आहे. सामंत यांचा सतत 'उदय'च होत आहे.. मात्र शिंदे सध्या राहुल शेवाळे यांच्यावर अधिकाधिक जबाबदाऱ्या टाकत आहेत. म्हणूनच भविष्यात धनुष्यबाणाची प्रत्यंचा कोणा कोणावर रोखली जाते, ते आता पाहायचे..
आज आपण मुख्यमंत्री असतो, तर दावोसमध्ये जाऊन यापेक्षा जास्त गुंतवणूक आणली असती, असा विचार एखाद्याच्या मनात सहज आला असणार. एकनाथजी देखील मनातल्या मनात 'पुन्हा येईन', 'पुन्हा येईन' चा जप करतच असणार. त्यांना शुभेच्छा!
हेमंत देसाई

