shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौतमची प्रशिक्षणातील गंभीर कामगिरी

    मागील दशकात विजयाच्या शिखरावर चालणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी सध्या खालच्या दिशेने घसरत आहे. त्यामुळे समस्त भारतीय क्रिकेटच सध्या गोंधळाच्या टप्प्यात आहे. मागील काही वर्षात टीम इंडिया मोठ्य उंचीवर पोहोचली आहे. त्यांनी आयसीसी फायनलमध्ये प्रवेश केला, दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या, फलंदाजांनी जागतिक दर्जाचे विक्रम प्रस्थापित केले आणि मजबूत गोलंदाजी आक्रमणाने घरच्या मैदानावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही वर्चस्व राखले. मात्र गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली ध्येय अस्पष्ट झाले आहे असे दिसते. 
सलग ऐतिहासिक कसोटी पराभव
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सारख्या संघांविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव, मोठे पाठलाग चुकवणे आणि अनेक दशके अबाधीत असलेले जुने विक्रम मोडणे या सर्वांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. नुकताच वनडे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर १-२ असा पराभव झाल्याने या वादाला पुन्हा उधाण आले आहे.

गंभीरच्या मार्गदर्शनात वनडे मालिकातही पिछेहाट
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने पाच मोठ्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत आणि त्याचे निकाल आश्चर्यकारक आहेत. भारताने घरच्या मैदानावर आणि परदेशात पाचपैकी तीन मालिका गमावल्या आहेत. सन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून या स्वरूपात भारताची कामगिरी खराब आहे. याचा अर्थ असा की संघाची घडी बिघडली आहे आणि ही बाब कोणत्याही अव्वल संघासाठी चिंताजनक आहे.

गंभीरच्या कारकिर्दीत कोणत्या मालिका खेळल्या गेल्या?
या काळात भारताने तिन्ही प्रकारांमध्ये मोठे चढ-उतार अनुभवले. एकेकाळी घरच्या मैदानावर "अजिंक्य भिंत" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या कसोटी संघाला आता सलग पराभवांचा सामना करावा लागत आहे. न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा पराभव आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ असा पराभव झाल्याने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. क्रिकेट विश्लेषक, माजी महान खेळाडू आणि चाहते या पराभवासाठी भारतीय खेळाडू व प्रशिक्षक गंभीर या दोघांनाही जबाबदार धरत आहेत. प्रशिक्षक गंभीरने पत्रकार परिषदेत टीकेला उत्तर दिले आहे. त्याला काढून टाकण्याचा किंवा न टाकण्याचा निर्णय बीसीसीआयवर अवलंबून आहे, परंतु बोर्डाने त्यांचे यश विसरू नये असे म्हणून भावनीक ब्लॅकमेलींगही केले आहे.  आता मोठा प्रश्न असा आहे की: भारताच्या कसोटी घसरणीसाठी गौतम गंभीर जबाबदार आहे का ?  चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी घटना असली तरी गंभीरच्या कर्तृत्वापेक्षा रोहित- द्रविड जोडीने घडविलेल्या संघाची भूमिका मोठी आहे.

गंभीरच्या काळात वाईट रेकॉर्ड घडले 
क्रिकेटमध्ये काही रेकॉर्ड बनतात, त्यातील काही स्पृहणीय तर काही अयोग्य असतात. परंतु गंभीरच्या काळात बनवलेल्या काही रेकॉर्ड्सनी चाहत्यांना हादरवून टाकले. पूर्वी घरच्या मैदानावर भारताची भूमिका मजबूत होती, परंतु विरोधी संघांनी ही भिंत आता निव्वळ पाडलीच नाही तर उध्वस्त केली. मिशन २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊनही, हे नको असलेले रेकॉर्ड्स चिंतेचे कारण आहेत. इतिहासावरील या डागांकडे दुर्लक्ष करणे आता कठीण आहे. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली, न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत व्हाईटवॉश झाला, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली, 

सर्वाधिक टीकेचे धनी बनलेले काही निर्णय
कसोटी संघात वारंवार बदल, संघ संयोजनाचा अभाव, कसोटीत विशेषज्ञ खेळाडू महत्त्वाचे असताना तज्ञां खेळाडूंपेक्षा अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देणे, गेल्या वर्षभरात, भारताने वारंवार संघ निवड, खेळपट्टी निवड आणि रणनीती बदलली आहे, परंतु कामगिरीत सातत्य राखणे जमले नाही. पहिल्या चुकीनंतर खेळाडूंना वगळण्याच्या धोरणामुळे संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

ज्येष्ठ खेळाडू निवृत्तीचा वाद
विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चाहत्यांनी आरोप केला आहे की, संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकाने त्यांच्यावर दबाव आणला. परंतु वास्तव गुलदस्त्यातच आहे. 

फिरकी गोलंदाजांचे अपयश चिंताजनक
एरव्ही घरच्या मैदानाचे राजे, भारतीय फिरकीपटू घरच्या मैदानावरच कुचकामी ठरले आहेत. असे म्हटले जात आहे की गंभीरला भारताने कसोटीत अशा खेळपट्टया तयार करायच्या होत्या जिथे तिसऱ्या सत्रापासून चेंडू वेगाने वळेल. परंतु ही रणनीती उलटली. न्यूझीलंडनंतर, दक्षिण आफ्रिकेने याचा फायदा घेतला.

कर्णधारपदाची रणनीती बदलणे
अनुभवी रोहित शर्मालाडावलून नवख्या शुभमन गिलला कर्णधार बनवणे यामुळे ड्रेसिंग रूममध्ये असंतुलन वाढले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशानंतर रोहितला अचानक कर्णधारपदावरून काढून टाकणे हे अनाकलनीय होते. शिवाय, टी-२० संघात शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून जबरदस्तीने समाविष्ट करणे उलटेच झाले.

घरच्या मैदानावर कमकुवत फलंदाजी सुरूच
टीम इंडियाकडे स्वतःला सांभाळू शकेल आणि गोलंदाजांना थकवू शकेल अशा चांगल्या मधल्या फळीतील फलंदाजांची कमतरता आहे. डावाची उभारणी करू शकणाऱ्या फलंदाजांची कमतरता ही वारंवार येणारी समस्या आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताला एकही शतक करता आले नाही आणि चार डावांमध्ये एकदाही भारतीय संघ २०२ धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही काही फलंदाज वगळता इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले.

अनुभवी खेळाडूंना डावलणे अंगलट
विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी करूनही मोहम्मद शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघात स्थान देण्यात आलेले नाही. अक्षर पटेलला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आणि वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळला नसला तरी बुमराहचे वर्कलोड व्यवस्थापन सुरूच आहे. हार्दिक पंड्यालाही विश्रांती देण्यात आली, खरं तो संघाला संतुलन प्रदान करतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट फॉर्म दाखवणाऱ्या ऋतुराज गायकवाडला कोणतेही कारण नसताना वगळण्यात आले. या निर्णयांमुळे संघात अस्थिरता निर्माण झाली. क्रिकेट हे एका यंत्रासारखे आहे, एकदा संतुलन बिघडले की, निकाल बिघडू लागतात.

गंभीर अपयशी आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर भावनांमध्ये नाही तर आकडेवारीमध्ये आहे. भारत न्यूझीलंडच्या टीम अ किंवा ब विरुद्ध नाही तर टीम क विरुद्ध हरला. किवी संघ रचिन रवींद्र, विल्यमसन, सँटनर, मिल्ने आणि मॅट हेन्रीशिवाय आला होता, तरीही त्यांनी भारताला त्यांच्याच मैदानांवर हरवले. अनेक क्रिकेट तज्ञांचा असा विश्वास आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजय चांगल्या प्रकारे तयार केलेल्या संघामुळे झाला. रोहित आणि द्रविडने तो संघ तयार केला होता. हा संघ सन २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या संघासारखा होता, ज्यामध्ये काही खेळाडू बदल झाले होते. त्यामुळेच विजय शक्य झाला, परंतु त्यानंतरच्या बदलांमुळे पराभव झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजय आणि टी२० मधील कामगिरी वगळता, भारतीय संघाची एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही.

गंभीरच्या कालखंडात
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एकदिवसीय आणि टी२० मध्ये इंग्लंडचा पराभव केला. एकदिवसीय आणि टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. पण, घरगुती कसोटी सामन्यांमधील वर्चस्व तुटले. ३६ आणि ३८ वर्षे जुने विक्रम मोडले गेले. जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावले.सेना देशांविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये कमकुवतपणा दिसून आला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्य कमी असल्याचे दिसून आले. हाच विरोधाभास भारतीय क्रिकेटला त्रास देत आहे. संघ खूप चांगला आणि अगदी सामान्य दिसतो.

चाहत्यांच्या रागाचा भडका उडाला
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी, क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही; तो श्रद्धा, इतिहास आणि ओळखीचे प्रतीक आहे. परिणामी, घरच्या मैदानावर झालेल्या पराभवांच्या मालिकेमुळे भारतीय चाहते संतप्त झाले आहेत आणि ते गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना हटवण्याची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि त्याने पत्रकार परिषदेत म्हटले की, लोकांनी प्रशिक्षक म्हणून त्याच्या कामगिरीचाही विचार केला पाहिजे. तथापि, चाहत्यांनी आता त्या विधानाचा उल्लेख केला आहे आणि गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने निदर्शनास आणून दिले की, टीम इंडियाचे विक्रमी विजय हे परदेशी संघांनी भारतात मिळवलेल्या विक्रम आणि विजयांपेक्षा खूप मोठे आहेत.

भविष्य अंधकारमय
गौतम गंभीरच्या काळात एका मोठ्या प्रश्नाने वेढलेले आहे: भारतीय क्रिकेटचा ऱ्हास सुरू झाला आहे का ? चाहते आणि तज्ञ यांचे वेगवेगळे मत असू शकतात, परंतु सत्य हे आहे. संघाला स्थिर रणनीतीची आवश्यकता आहे. निवडीत निष्पक्षता आवश्यक आहे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आत्मविश्वास आवश्यक आहे

नेतृत्वात स्पष्टता नाही
भारताकडे अजूनही एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट, रोहित, बुमराह, जडेजा, सिराज, अक्षर आणि राहुलसारखे स्टार खेळाडू आहेत आणि मिशन २०२७ लक्षात घेता, मार्ग बदलण्याची संधी आहे. विश्वचषकासाठी अजूनही वेळ आहे आणि २०२७ हा रोहित आणि कोहलीचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. म्हणून, आता किंवा कधीही नाही अशी रणनीती आवश्यक असेल. गंभीरचे आव्हान आता फक्त सामने जिंकण्याचे नाही तर टीम इंडियाची ओळख वाचवण्याचे आहे. ही बाब त्याने प्राधान्याने ध्यानात ठेवण्याची गरज आहे.

@डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close