सिंगापूर, वार्ताहर
आजची तरुणाई दशाहीन व दिशाहीन असल्याची सरसकट टीका केली जाते; मात्र वास्तव वेगळे असून आजची तरुणाई ही दशाहीन नसून स्पष्ट ध्येयाच्या शोधात असलेली संवेदनशील, सजग व सामर्थ्यवान पिढी आहे, असे परखड मत खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त), खडकी येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले.डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आकुर्डी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर, मौजे सिंगापूर, ता. पुरंदर, जि. पुणे येथे “आजची तरुणाई : दशा आणि दिशा” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. पांढरमिसे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानात आजच्या तरुणाईसमोरील मानसिक ताणतणाव, स्पर्धात्मक वातावरण, अपेक्षांचे ओझे, सोशल मीडियाचा अतिरेक, मूल्यशिक्षणाचा अभाव आणि बदलते आदर्श यांचा सखोल ऊहापोह केला. “आजचा तरुण आळशी नाही, तो बुद्धिमान, कष्टाळू व जागरूक आहे; मात्र योग्य मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित दिशादर्शनाच्या अभावामुळे तो संभ्रमावस्थेत सापडतो. साधने, संधी आणि वेग वाढले आहेत; पण ध्येयाची स्पष्टता कमी होत चालली आहे,” असे त्यांनी नमूद केले.सोशल मीडियाच्या प्रभावावर बोलताना त्यांनी सांगितले की, हे माध्यम अभिव्यक्तीचे व्यासपीठ असले तरी अतिरेक झाल्यास तुलना, न्यूनगंड आणि असमाधान निर्माण होते. त्यामुळे तरुणांनी स्क्रीनटाइम मर्यादित ठेवून वाचन, चिंतन, आत्मपरीक्षण आणि सामाजिक भान जोपासावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी मूल्य, संघर्ष, सातत्य आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी माने यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रमांची अंमलबजावणी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. अशा वैचारिक व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ.डी. वाय पाटील संस्थेचे संचालक ललित प्रसाद सर यांनी आपल्या मनोगतात आजच्या तरुणाईला योग्य ध्येय व दिशा देण्यात शिक्षणसंस्था आणि राष्ट्रीय सेवा योजना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. समाजाभिमुख, मूल्याधिष्ठित आणि जबाबदार नागरिक घडवणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली पिंपळकर या विद्यार्थिनीने प्रभावीपणे केले, पाहुण्यांचा परिचय पृथ्वीराज शर्मा या विध्यार्थाने करून दिला तर आभार प्रदर्शन तेजस्विनी पिदुरकर या विद्यार्थ्यानी केले. शिबिरातील स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली असून अनेक स्वयंसेवकांनी या व्याख्यानामुळे आत्मपरीक्षणाची आणि ध्येय निश्चितीची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

