भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार २०२५ डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना सन्मान
इंदापूर : खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त), खडकी,पुणे येथे इतिहास विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे इतिहास संशोधक व समाजभान, सामाजिक बांधिलकी जपणारे प्राध्यापक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना “भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार २०२५” आझम कॅम्पस पुणे येथे दि. 11 जानेवारी, 2026 रोजी क्रांत्रिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाजी शहीद कादरी, आजम कॅम्पसच्या अध्यक्षा डॉ.अबिदा इनामदार, हनुमंत चव्हाण, सतीश वाघमारे, मुस्तफा सैद्द या मान्यवरांचा उपस्थित प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक व राष्ट्रउभारणीच्या कार्याचा हा सन्मानपूर्वक गौरव असून, या पुरस्कारामुळे खडकी शिक्षण संस्थेसह संपूर्ण शैक्षणिक विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. प्रकाश पांढरमिसे हे इंदापूर तालुक्यातील रुई (बाबीर) थोरातवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत.अतिशय खडतर परिस्थितीवून त्यांनी शिक्षण घेत आजवरचा हा प्रवास केला आहे.
डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी अध्यापनाला केवळ नोकरी न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले आहे. इतिहास विषयाच्या अध्यापनासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विभागीय समन्वयक म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सामाजिक भान, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनमूल्यांची रुजवणूक केली. राष्ट्रीय सेवा योजना, व्याख्यानमाला, कार्यशाळा, शिबिरे, जनजागृती उपक्रम यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कोवीडच्या काळात इंदापूर तालुक्यात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना सोबत घेऊन केलेले कार्याचीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दखल घेऊन त्यांचा गौरव केलेला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाअंतर्गत कायमस्वरूपी व्याख्याता म्हणून डॉ. पांढरमिसे यांनी शाळा, महाविद्यालये, ग्रामीण व शहरी भाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना येथे आजपर्यंत २३०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. इतिहास, राष्ट्रवाद, संविधानिक मूल्ये, सामाजिक जाणीव, युवक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा, गड–किल्ले संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता अशा विविध विषयांवर त्यांचे व्याख्यान समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरले आहे.संशोधन क्षेत्रातही डॉ. पांढरमिसे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४५ पेक्षा अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी इतिहास, समाज, शिक्षण व समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. तसेच इतिहास विषयाशी संबंधित पुस्तकांचे लेखन करून त्यांनी मराठी ज्ञानपरंपरेत मोलाची भर घातली आहे.
त्यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, तसेच प्राध्यापक मित्रपरिवार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “हा पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रमांचा, निष्ठावान अध्यापनाचा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचा सन्मान आहे,” असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.
डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना लाभलेला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, तो गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेला समर्पित असलेल्या शिक्षकवर्गाचा गौरव आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक व सामाजिक कार्यासाठी सर्व इंदापूर तालुका व जिल्हा स्तरातून स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

