एरंडोल महाविद्यालयाचे रासेयो विशेष हिवाळी शिबिर धारागीर येथे सुरू; पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमीन विकासावर भर.
एरंडोल | दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव धारागीर येथे ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत “शाश्वत विकासासाठी युवक” या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक बालसिंग पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष अमित पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील, बापूसाहेब जगदीश पाटील, सरपंच सौ. वैशाली पाटील यांच्यासह ग्रामपंचायत, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिबिरात पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, आरोग्य शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह कायदा आदी विषयांवर प्रत्यक्ष कृती व मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी बोलताना बापूसाहेब जगदीश पाटील म्हणाले, “राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समाजसेवेची जीवनशैली घडवणारी चळवळ आहे.” तर अध्यक्ष अमित पाटील यांनी “NSS मुळे विद्यार्थ्यांना समाजाप्रतीची जबाबदारी आणि नेतृत्वाचे संस्कार मिळतात,” असे मत व्यक्त केले.


