जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये मनसेच्या शहर अध्यक्षाचा खून झाला, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांची अमित ठाकरे यांनी भेट घेतली आणि अशाप्रकारच्या राजकारणाला काही अर्थच नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्या कुटुंबीयांना त्यांनी आधार दिला आणि अमित हे ज्या पद्धतीने व्यक्त झाले, ते मला खूप आवडले. त्यावर माझी प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर, अमित यांचा मला फोन आला. त्यापूर्वी एकदाच आझाद मैदानासमोरच्या 'सत्याचा मोर्चा'च्या वेळी ते मला भेटून, नमस्कार करून गेले होते.
अमित ठाकरे यांनी स्वतःहून मला भेटायची इच्छा व्यक्त केली आणि सोमवारी संध्याकाळी ते मला भेटायला मुंबईत घरी आले. तासभर आमच्या गप्पा झाल्या. सध्याच्या राजकारणाची घसरलेली पातळी, समाजमाध्यमांतून होणारे ट्रोलिंग, गलिच्छ आरोप- प्रत्यारोप, एकूणच होत असलेली अधोगती याबद्दल अमित यांच्या मनात तीव्र नाराजी आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीचे मूलभूत प्रश्नच अद्याप सुटले नसल्याबद्दल अमितनी चिंता व्यक्त केली. खराब रस्ते, अन्यायकारक टोलवसुली, नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण लांबणे या प्रश्नावर अमित यांनी मनसेतर्फे आंदोलनेही केली आहेत. मात्र ज्यावेळी सत्तेत पक्ष येईल, तेव्हा राजकारणात व शहरांमध्ये काही ना काही सुधारणा करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
राजकारणात आलो आहोत, तर काहीतरी चांगले करण्याची त्यांची इच्छा आहे. अमित ठाकरे हे संकोची आहेत. सतत बडबड करणे, भाषणे देणे, बाइट्स देणे हा त्यांचा स्वभाव नाही. कुणाचा ना कुणाचा तरी द्वेष करणे, विरोधकांबद्दल वाईट अभद्र वा कंठाळी बोलणे हे अमित यांच्च्या स्वभावातच नाही. तुमच्या काळातील राजकारण खूप चांगले होते, त्याचा स्तर उत्तम होता, अशी भावना अमित यांनी व्यक्त केली. राजकारण प्रश्नकेंद्रित, म्हणजेच इश्यूकेंद्रित असावे, असे अमितना वाटते.
आज तरुण पिढी निराश झाली आहे. अनेकांचा इथल्या राजकारणातील प्रदूषित वातावरण पाहून कोंडमारा होत आहे, असे अमित यांचे मत आहे. मात्र संधी मिळाल्यास शिक्षण, आरोग्य, रस्ते असे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. अमित ठाकरे हे शांत प्रवृत्तीचे आहेत. ते चहा, कॉफी काही घेत नाहीत. अत्यंत फिट आहेत.
अमित यांना महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्दर्शक 'सिनेमात काम करणार का?' असे विचारत असतात. पण त्यांना तशी इच्छा नाही. मात्र चित्रपट माध्यमाची त्यांना आवड आणि जाणही आहे. मुंबईतील मराठी माणसावर त्यांनी अभिषेक गुणाजी व इतर सहकार्यांसह मिळून बनवलेली डॉक्युमेंटरी अप्रतिम आहे. या छोट्याशा डॉक्युमेंटरीत भरत जाधव यांनी कमालीचा उत्कट अभिनय केला आहे. मराठी माणसाच्या दुःखाची नस पकडणारी ही डॉक्युमेंटरी अमित, गुणाजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतील आहे. अमित ठाकरे यांना स्केचेस काढण्याचा वारसा बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडूनच मिळाला आहे.
अमितना पियानो वाजवण्याची आवड आहे. दिवसभरच्या तणावानंतर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकले की त्यांना शांत वाटते. आपण राजकारण एका बाजूला ठेवू या. कुठल्याही पक्षातील का असेनात, पण सच्ची, निर्मळ आणि साधी माणसे पाहिली, भेटली की बरे वाटते.
अमित ठाकरे माझ्याकडे आले, तेव्हा एखाद्या साध्या माणसाप्रमाणे त्यांच्याबरोबर ना समर्थकांची गर्दी होती, ना मोठा जामानिमा! ते येऊन गेल्याचे कोणाला कळलेदेखील नाही... प्रसिद्धीपासून दूर असलेले, पारदर्शक, सरळ मनाचे, आशावादी आणि दुसऱ्यासाठी काहीतरी सकारात्मक करू पाहणारे नेते,, एवढेच काय, सामान्य लोकही आजकाल क्वचितच भेटतात... कुठलाही नाटकी आविर्भाव वा आवेश नसलेले अमित ठाकरे भेटले, तेव्हा खरेच, बरे वाटले... घरी बनवलेला तिळगुळ त्यांना दिला आणि मी लिहिलेले 'मनमोहन पर्व' हे पुस्तक देखील दिले.

