shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवनिर्वाचित महापौरांचे असेही स्वागत...ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

नवनिर्वाचित महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांनी आपल्या कारकिर्दीची धडाकेबाज सुरुवात केली आहे. त्यांचे पती कमलेश निकम हे आधीपासूनच धडाकेबाज कार्यकर्ते  म्हणून ओळखले जातात. महापौर ज्या पद्धतीने ac chamber मधून राजकारण न करता प्रत्यक्ष फिल्ड मध्ये उतरून काम करीत आहेत ते वाखाणण्याजोगे आहे. आजवरच्या महापौरांपैकी कोणी असे फिल्ड वर्क केलेले माझ्या पाहण्यात नाही. पपू कलानी यांचे कुशल मार्गदर्शन व कमलेश निकम यांची समर्थ साथ त्यांना लाभत आहे. उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक सुशिक्षित महापौर म्हणून अश्विनी निकम यांची नोंद होईल.

उल्हासनगर महापालिका हे समस्यांचे आगार आहे. प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. त्याला आळा घालण्याचे, त्यांच्या पुढे मोठे आव्हान असणार आहे. प्रचंड खर्च करून नगरसेवक झालेले लोक दुष्काळातून बाहेर पडलेल्या स्वापदासारखे लूटमार करण्यासाठी टपून बसतील. त्यात स्वपाक्षिय व हितसंबंधित ही असतील. त्यांना आवर घालणे हे जिकरीचे काम असेल.महापालिका आयुक्तांना एक वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे त्यांना शहरातील समस्यांचे आकलन झालेच असेल. त्यांच्याशी समन्वय साधून समस्यांचे निराकरण करता येईल.

महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. कर्जाचा भलामोठा डोंगर  आहे. त्यामुळे अनावश्यक कामांना फाटा देऊन अत्यावश्यक कामेच हाती घेतली पाहिजे. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रकाशित केलेली श्वेतपत्रिका सतत डोळ्यासमोर ठेवून पाऊल उचलावे लागेल. नगरसेवकांनी सुचवलेली अनावश्यक कामे टाळावी लागतील. कारण नव्याने निवडून आलेले नगरसेवक सवंग लोकप्रियतेसाठी अनेक कामे घेऊन येतील, त्यातील अत्यावश्यक तेवढीच विचारात घ्यावी लागतील. तरच ताळमेळ बसेल. त्याशिवाय उत्पन्नाचे नव नवीन स्रोत शोधावे लागतील.

 महापालिकेकडे सध्या मालमत्ता कर हेच मोठे  उत्पन्नाचे साधन आहे. मालमत्ता कर निर्धारक नीलम शेजवळ बोडारे ह्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवता येईल. दुबार मालमत्ता वगळाव्या लागतील तरच वस्तूनिष्ठ थकीत मालमत्ता कर कळू शकेल. अनेक मालमत्ता ह्या under assess झाल्या आहेत, त्यात बडी धेंडे मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या मालमत्ताचे रेअसेसमेंट करून त्यांच्या कडून सक्तीने मालमत्ता कर वसुली दुप्पट शास्तीसह वसुल झाली पाहिजे. अनेक नवीन इमारतींचे वेळेवर assessment होत नाही, त्यामुळेही कर बुडतो. नगर रचना विभागात मोठा घोटाळा होतो तो देखील रोखला पाहिजे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग हे ठेकेदार व लोकप्रतिनिधीना भ्रष्ठाचार करण्याचे कुरण झाले आहे. निकृष्ट काम, काम न करता किंवा अर्धवट काम करून बिल काढणे, तेच तेच रस्ते पुन्हा पुन्हा खोदून बनवणे व नविन कामाप्रमाणे बिल काढणे, अश्या अनेक मार्गाने मनपा तिजोरीची लूट वर्षानुवर्षे सुरू आहे. ती रोखता आली पाहिजे.

मनपा शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. बंद पडलेल्या शाळा इमारतींवर डोळा ठेवून त्या नगण्य भाड्याने lease वर दिल्या जात आहेत. शाळांचा दर्जा सुधारून  विध्यार्थी संख्या कशी वाढेल याचा अग्रक्रमाने विचार झाला पाहिजे. 

शहरातील वाचलेल्या भूखंडांचे संरक्षण करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. सार्वजनिक शौचालयावरील अतिक्रमणे हटवून ती ताब्यात घेणे, महापालिकेची समाज मंदिरे ताब्यात घेऊन तिथे महापालिकेचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. फूट पाथवर व्यापारी व गॅरेजमालक करीत असलेली अतिक्रमणे तात्काळ प्रभावाने हटवली पाहिजेत.

आत्ता नव्याने सभापती नेमले जातील त्यांच्या दालनांच्या सुशोभीकरणावरील खर्चाला मर्यादा आखुन दिली पाहिजे.

याशिवाय नादुरुस्त रस्ते, नाले, गटारी, धुळीचे साम्राज्य, सार्वजनिक स्वछता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. डम्पिंग ग्राउंडची भीषण समस्या पाच नंबरच्या लोकांना भेडसावत आहे. महापालिकेच्या भूखंडांवरील अनधिकृत पे and पार्क ताब्यात घेऊन निविदा काढल्या पाहिजेत. शहरात गुंडगिरी फार माजलेली असल्याने प्रत्यक मोक्याच्या ठिकाणी cc कॅमेरे लावले पाहिजेत. महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छता गृह असली पाहिजेत. नेहरू चौक, शिरू चौक गोल मैदान परिसरातील रस्ते रुंद झाले पाहिजेत. अरुंद गल्ल्या वाढवून त्यातून किमान ambulance व fire briged जाईल इतक्या त्या रुंद कराव्यात.

नवीन महापौरांच्या स्वागत प्रसंगी इतक्या साऱ्या समस्या मांडणे गैर असले तरी आवश्यक वाटले. या समस्यांची नोंद ठेवून  टप्या टप्याने ही कामे मार्गी लावावीत, हीच अपेक्षा. सद्या माझ्यावरील हल्यामुळे माझा हात fracture असल्याने प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता येत नसल्या तरी बरं झाल्यावर भेटून बुके ऐवजी बुक देऊन नक्की स्वागत करेन.


close