shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वैभवाच्या वादळात सनरायझर्सचा सूर्य मावळला...


राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला ४७ धावांनी पराभूत करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. आता हा संघ शुक्रवार, २९ मे रोजी गुजरात टायटन्सचा सामना करेल. बुधवारी मुल्लानपूर येथे झालेल्या आयपीएल सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, वैभव सूर्यवंशी (९७) आणि ध्रुव जुरेल (५०) यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकांत आठ गडी गमावून २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबाद १९.२ षटकांत केवळ १९६ धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला.

करा किंवा मरा सामना
क्वालिफायर २ चा सामना राजस्थान आणि गुजरातसाठी 'करा किंवा मरा' असा असेल. या सामन्याचा विजेता ३१ मे रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्ध अंतिम सामना खेळेल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

राजस्थानचा डाव
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने राजस्थानला भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांनी ४८ चेंडूंमध्ये १२५ धावांची भागीदारी केली. वैभवने १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २९ चेंडूंमध्ये १२ षटकार आणि पाच चौकारांसह ९७ धावा केल्या, तर जयस्वालने २९ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. राजस्थानने १३७ धावांवर आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते.

यानंतर, कर्णधार रियान परागने ध्रुव जुरेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी २१ चेंडूंमध्ये ५५ धावांची भागीदारी केली. ध्रुवने २१ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि पाच चौकारांसह ५० धावा केल्या. डोनोव्हान फरेरा आणि रवींद्र जडेजा यांनी संघाच्या खात्यात प्रत्येकी १२ धावांची भर घातली. प्रफुल्ल हिंगेने ५४ धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले. याव्यतिरिक्त, ईशान मलिंगा, शिवांग कुमार आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.

हैदराबादचा डाव
प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबादचा संघ १९.२ षटकांत १९६ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक शर्मा (०) बाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला. त्यानंतर इशान किशनने ट्रॅव्हिस हेडसोबत अवघ्या १५ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र, इशान (३३) बाद होताच संघ कोसळला.

हैदराबादने ६.५ षटकांत केवळ ८१ धावात  अर्धा संघ गमावला. त्यानंतर सलील अरोराने नितीश रेड्डीसोबत सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. नितीश ३८ धावांवर बाद झाला, तर सलीलने ३५ धावा केल्या. शिवांग कुमारने २७ धावांचे योगदान दिले. विरोधी संघाकडून जोफ्रा आर्चरने तीन बळी घेतले. नांद्रे बर्गर, सुशांत मिश्रा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर यश राजने एक बळी घेतला.

वैभवचा नावाला साजेसा खेळ

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल २०२६ एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ एका चेंडूने एक मोठा टप्पा गमावला. तो ख्रिस गेलचा सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडू शकला असता, पण प्रफुल्ल हिंगेच्या गोलंदाजीवर आर. स्मृतीने त्याचा झेल घेतला. सूर्यवंशी ९७ धावांवर बाद झाला.

गेलचा विक्रम वाचला
आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. सूर्यवंशी आज त्याचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तो बाद झाला. तो २९ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने ९७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या काळात त्याचा स्ट्राईक रेट ३३४.४८ होता.

वैभवची मोठी कामगिरी 
वैभवची ९७ धावांची खेळी ही आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कोणत्याही फलंदाजाने केलेली दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी, आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर २ मध्ये आरसीबीविरुद्ध जॉस बटलरने नाबाद १०६ धावा केल्या होत्या. सूर्यवंशीने यशस्वी जयस्वालसोबत १२५ धावांची सलामी दिली. आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यात कोणत्याही संघाच्या फलंदाजांनी केलेली ही दुसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. यापूर्वी, २०११ च्या अंतिम सामन्यात चेन्नईकडून मुरली विजय आणि मायकल हसी यांनी आरसीबीविरुद्ध १५९ धावा जोडल्या होत्या.

वैभवने यशस्वीला मागे सोडले 

वैभव एकाच आयपीएल हंगामात कोणत्याही अनकॅप्ड फलंदाजापेक्षा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात ६८० धावा केल्या आहेत. या बाबतीत, या १५ वर्षीय फलंदाजाने २०२३ मध्ये राजस्थानकडून खेळताना ६२५ धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला मागे टाकले आहे.

एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे अनकॅप्ड फलंदाज
वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स २०२६, ६८०* यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्स २०२३, ६२५ धावा. शॉन मार्श पंजाब किंग्स २००८, ६१६ धावा.  रियान पराग राजस्थान रॉयल्स २०२४- ५७३. प्रभसिमरन सिंग पंजाब किंग्स २०२५, ५४९ धावा

गिलला मागे टाकले
वैभव आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात एकूण १२ षटकार मारले. या बाबतीत त्याने सध्याचा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला मागे टाकले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या २०२३ च्या प्लेऑफ सामन्यात १० षटकार मारले होते. दरम्यान, गुजरातविरुद्धच्या मंगळवारच्या सामन्यात नऊ षटकार मारणारा रजत पाटीदार तिसऱ्या स्थानावर आहे. एका डावात १० पेक्षा जास्त षटकार मारणारा वैभव ख्रिस गेलच्या पंक्तीत सामील झाला आहे. दोघांनीही आयपीएलच्या डावात प्रत्येकी चार वेळा १० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत.

@डॉ.दत्ता विघावे              
     क्रिकेट समिक्षक 
     मो.नं. ९०९६३७२०८२.
close