दि. २७ मे, २०२६
कार्यकाळ १० वर्षांपर्यंत वाढवला, ३ वर्षांचा 'कूलिंग-ऑफ' कालावधी सक्तीचा
दिनांक २७ मे २०२६
*अमरावती:* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सहकारी बँकांच्या कारभारात पारदर्शकता व सुशासन आणण्यासाठी संचालकांच्या कार्यकाळ व पुनर्नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण दुरुस्ती निर्देश २५ मे, २०२६ पासून लागू केले आहेत.
प्रमुख तरतुदी:
१. कार्यकाळ मर्यादेत वाढ: यापूर्वी सहकारी बँक संचालकांचा कमाल कार्यकाळ ८ वर्षे होता. बँकिंग कायदे (दुरुस्ती) कायदा, २०२५ नुसार १ ऑगस्ट, २०२५ पासून हा कार्यकाळ १० वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
२. ३ वर्षांचा सक्तीचा विश्रांती कालावधी: १० वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकाला पुन्हा त्याच बँकेत संचालक होण्यासाठी किमान ३ वर्षांचा कूलिंग-ऑफ कालावधी पूर्ण करणे बंधनकारक असेल. या काळात संबंधित व्यक्तीला बँकेत कोणतेही अधिकृत पद किंवा संचालक भूमिका स्वीकारता येणार नाही.
३. सलग कार्यकाळाची गणना: कार्यकाळांमध्ये ३ वर्षांपेक्षा कमी खंड असल्यास तो सलग कार्यकाळ धरला जाईल. मागील सेवा रद्द होण्यासाठी किमान पूर्ण ३ वर्षांचा खंड आवश्यक आहे.
४. लागू असलेल्या बँका: हे नियम सर्व शहरी व ग्रामीण प्राथमिक सहकारी बँकांना लागू असतील.
कायदेशीर आधार: बँकिंग नियमन कायदा, १९४९ चे कलम 35A, 10A(2A)(i) व 56 अंतर्गत RBI ने हे निर्देश जारी केले आहेत. तात्काळ पुनर्निवडणुकीच्या पळवाटा बंद करून बँकिंग क्षेत्रातील कारभार अधिक जबाबदार बनवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या नियमांमुळे सहकारी बँकांच्या संचालक मंडळात नवीन नेतृत्वाला संधी मिळेल व घराणेशाहीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डी. एस. पवार
महामंत्री सहकार भारती अमरावती जिल्हा
माजी अध्यक्ष स्वास्थ्य सेवा हिवताप सेवकाची सहकारी पतसंस्था र. नं. 146 तथा सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा अमरावती

