shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात एक नंबरचे केंद्र बनावे - उपसभापती जयकुमार कारंडे.बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात 'मॉड्युलर ओटी' व अद्ययावत प्रसूती कक्षाचे उद्घाटन.

बिजवडी प्राथमिक आरोग्य  केंद्राने जिल्ह्यात एक नंबरचे केंद्र बनावे - उपसभापती जयकुमार कारंडे.

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात 'मॉड्युलर ओटी' व अद्ययावत प्रसूती कक्षाचे उद्घाटन.
इंदापूर:  बिजवडी प्राथमिक आरोग्य  केंद्राने जिल्ह्यात एक नंबरचे केंद्र बनावे, यासाठी माझ्याकडून  सदैव सहकार्य मिळेल असे  इंदापूर पंचायत समिती जयकुमार कारंडे यांनी
ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने, इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या 'मॉडेल  प्राथमिक आरोग्य  केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते.
तसेच उपसभापती कारंडे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा 'स्मार्ट' करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य जनतेला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पण माझी विनंती आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे की, यंत्रसामग्री जितकी महत्त्वाची आहे, तितकीच आपली सेवा आणि आपुलकी महत्त्वाची आहे. रुग्णांशी प्रेमाने वागा, त्यांना धीर द्या.तसेच, ग्रामस्थांना माझी विनंती आहे की, या शासकीय मालमत्तेची निगा आपण सर्वांनी राखायची आहे. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, पंचायत समिती सदस्य दिलीप भिसे, सरपंच औदुंबर कचरे, दादा कचरे, दादा काळेल, तालुका विस्तार अधिकारी संतोष बाबर आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती करे, आरोग्य सहाय्यक देवेंद्र उतेकर, आरोग्य सहाय्यिका कमल पांचाळ, कनिष्ठ सहायक प्रवीण क्षीरसागर, आरोग्य सेविका रिझवाना तांबोळी, रोहिणी म्हेत्रे, मनिषा दंडी, आरोग्य सेवक इब्राहिम मकानदार, श्याम कांबळे, सुखदेव भोसले,राहुल देवकाते, संगणक तंत्रज्ञ अतुल तोंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिक लोंढे, संदीप रायपूरे, प्रवीण पोंदकुले, आनंद लांडगे, शिवाजी गोळे, सोनाली यादव, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इब्राहिम मकानदार यांनी केले तर नियोजन आणि यशस्वीतेसाठी प्रवीण क्षीरसागर, देवेंद्र उतेकर सह संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले

-----------------------------------

याप्रसंगी बोलताना डॉ. गणराज चौगुले यांनी माहिती दिली की, "ग्रामीण भागातील माता-बाल मृत्यूदर कमी करणे आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयांसारख्या सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.नवीन मॉड्युलर ओटीमुळे आता बिजवडी आणि परिसरातील रुग्णांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अत्यंत निर्जंतुक वातावरण आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेल्या या ओटीमुळे गुंतागुंतीच्या प्रसूती आणि इतर शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच सुरक्षितपणे करणे शक्य होणार आहे."
---------------------------------------------

"ग्रामीण भागातील सामान्य जनतेला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. मॉड्युलर ओटी आणि नवीन प्रसूती कक्षामुळे बिजवडी परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा अधिक उंचावेल तसेच प्रशासनाकडून सर्वोतोपरी गोर गरीब रुग्णासाठी मदत तातडीने केली जाईल."
— सचिन खुडे (गट विकास अधिकारी, इंदापूर)
--------------------------------
चौकट: 
आरोग्य केंद्राचा झालेला कायापालट आणि तेथील रुग्णस्नेही वातावरणामुळे हे केंद्र आता तालुक्यासाठी एक आदर्श ठरत आहे. इंदापूर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, 'मॉडल पीएचसी' अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि सुसज्ज प्रसूती कक्षाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणराज चौगुले यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'पुस्तकांची पीएचसी'. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराच्या तणावातून मुक्त करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी येथे सुसज्ज वाचनालय उभारण्यात आले आहे. साताऱ्यातील 'भिलार - पुस्तकांचे गाव' या धर्तीवर आधारित हा उपक्रम राबवणारे हे जिल्ह्यातील बहुधा पहिलेच आरोग्य केंद्र ठरले आहे.
close