संगमनेर ( प्रतिनिधी ) नॉर्वे देशामध्ये भारताचे पंतप्रधान जागतिक नेते नरेंद्रजी मोदी यांचे समोर नृत्य कला सादर करण्याचा बहुमान संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील रेश्मा नेहे यांना मिळाला हा गौरवास्पद क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या परदेश दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी नॉर्वे या देशालाही भेट दिली. या भेटीत राजधानी ओस्लो येथे त्यांना नॉर्वे देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान "ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट "या सन्मानाने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आपल्या भारतीय सांस्कृतिक पद्धतीने स्वागत करण्यात आले यावेळी नॉर्वे मध्ये भारतीय संगीत व नृत्य यांचे प्रशिक्षण वर्ग चालविण्याऱ्या सौ. रेश्मा नेहे यांच्या चमू ला मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमात रेश्मा नेहे आणि त्यांच्या सहकारी यांनी भरतनाट्यम, कुचिपूडी, ओडीसी,कथक आणि मोहिनीपट्टम हे शास्त्रीय नृत्य सादर केले. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा व परंपरेने केलेल्या विशेष स्वागताने पंतप्रधान मोदीजी अतिशय प्रसन्न व मंत्रमुग्ध झाले.
सौ रेश्मा नेहे या सावरगाव तळ ता संगमनेर येथील साहेबराव गेनूभाऊ नेहे पाटील यांच्या पत्नी असून माहेर संगमनेर तालुक्यातील निमज चे शांताराम खंडेराव गुंजाळ यांची कन्या आहे. साहेबराव नेहे हे नॉर्वे देशाची राजधानी ओस्लो येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. रेश्मा नेहे यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य व संगीताचे विशेष शिक्षण उच्च प्रविण्यासह पुर्ण केलेले असून त्या सध्या नॉर्वे देशात आपल्या देशाची सांस्कृतिक विरासत असलेले शास्त्रीय संगीत व नृत्य संवर्धन व प्रसारण कार्य करत आहेत. त्या तेथे आपल्या शास्त्रीय संगीत व नृत्य शिक्षणासाठी "कला नृत्य अकॅडमी " चालवत आहेत.
या अकॅडमी द्वारे भरतनाट्यम, ओडीसी, कथक, कुचिपूडी, मोहिनी पट्टम आदी शास्त्रीय नृत्य व संगीताचे प्रशिक्षण देत आहेत.
कोट:- भारतीय सांस्कृतिक कला ही जागतिक कीर्तीचे नेते अन आपल्या देशाचे मानबिंदू नरेंद्रजी मोदी यांचे समोर विदेशात सादर करण्याचे भाग्य लाभले. मोदीजी नी या कलेचे कौतुक केले हे माझ्या दृष्टीने गौरवास्पद आहे... रेश्मा नेहे, नॉर्वे
आमच्या गावातील महिला जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे विदेशात तेथील संसदेच्या विशेष सभागृहात स्वागत, सन्मान करण्याचा आणि त्यांना भेटण्याचा बहुमान मिळणं हे आमच्या गावासाठी मानाचा तुरा असून आणि अभिमानाची बाब आहे..!!
श्री. गोरक्ष नेहे पाटील, कामगार पोलीस पाटील, सावरगाव तळ

