श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील कथित अनियमितता, लाभार्थ्यांच्या तक्रारी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अखेर जनतेसमोर आल्या असून, या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सागर दयानंद शेळके यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती प्राप्त करून तसेच संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रकरण प्रकाशझोतात आणले.

मिळालेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार जिल्हा पुरवठा विभागाने घोगरगाव येथील स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता विविध अनियमितता आढळून आल्या. तपासणीदरम्यान शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. दक्षता समिती व इतर आवश्यक फलक न लावणे, रेशन दुकानाची नोंद अद्ययावत नसणे, साठा पुस्तके नियमित न भरणे तसेच विविध नोंदींमध्ये त्रुटी असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय ऑनलाइन साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये तफावत आढळून आली. तपासणी अहवालानुसार गहू, तांदूळ व मका या धान्यांच्या साठ्यात अतिरिक्त प्रमाण आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बाबी गंभीर स्वरूपाच्या मानून जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित परवानाधारकास नोटीस बजावून खुलासा मागविला होता.

या प्रकरणात सागर शेळके यांनी माहिती अधिकाराचा वापर करून संबंधित कागदपत्रे प्राप्त केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला तपासणी करून कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागली. या कारवाईनंतर लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी घोगरगाव येथील स्वस्त धान्य दुकान तात्पुरत्या स्वरूपात बनपिंप्री येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला.

तहसीलदार श्रीगोंदा यांना संबंधित दुकानातील अभिलेख, ई-पॉस मशीन व शिल्लक धान्य साठा पंचनामा करून हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घोगरगाव येथील लाभार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन नियमित धान्य वितरण करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लाभार्थ्यांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घोगरगाव परिसरातील अनेक नागरिकांनी सागर शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. "सातत्याने पाठपुरावा झाला नसता तर हे प्रकरण कदाचित जनतेसमोर आले नसते," अशी भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न उचलून धरत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी भविष्यातही संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका सागर दयानंद शेळके यांनी व्यक्त केली आहे.