इंदापूर - काळेवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी विद्यार्थी व पालकांसमवेत प्रत्यक्ष योगासने करून योगाभ्यासाचा आनंद लुटला. योगामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपशिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी विद्यार्थी जीवनातील योगाचे महत्त्व विषद केले. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या योग दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले. पालकांनीही विद्यार्थ्यांसोबत योगाभ्यासात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे शाळेचे परिसर आरोग्य, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला.
"करू योग, राहू निरोग" हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी पालक, विद्यार्थी,अंगणवाडी सेविका संगिता चव्हाण व मदतनीस मीराबाई नाईकवाडी मॅडम उपस्थित होत्या .

