नवी दिल्ली : भारताच्या अतिवेगवान रेल्वे प्रवासाच्या स्वप्नाला अखेर निश्चित दिशा मिळाली असून १५ ऑगस्ट २०२७ रोजी देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
ही सेवा मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात सुरत–बिलीमोरा हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यानंतर वापी–सुरत, वापी–अहमदाबाद आणि पुढे अहमदाबाद–ठाणे असे टप्प्याटप्प्याने मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.
सुमारे ५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्थानके असतील. जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित या ट्रेनचा कमाल वेग ३२० किमी प्रतितास असेल, तर डिझाइन वेग ३५० किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात उड्डाणपूल, बोगदे, पूल तसेच मुंबईजवळील समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे. प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू असून गुजरातमधील अनेक विभागांमध्ये काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशात प्रथमच बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय भारताच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरेल. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर देशात जलद, सुरक्षित आणि अत्याधुनिक रेल्वे प्रवासाचा नवा अध्याय सुरू होईल.
दरम्यान, प्रकल्पाच्या काही भागांमध्ये जमीन अधिग्रहण आणि खर्चवाढीशी संबंधित आव्हाने अद्याप कायम असली, तरी केंद्र सरकारने नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
०००

