शिर्डी (प्रतिनिधी) – ( तुषार महाजन )
अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सदस्यपदी शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई विजयाराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन व विकास समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची समिती मानली जाते. या समितीमध्ये पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि शासनाने नियुक्त केलेले सदस्य असतात. राज्य सरकारकडून दरवर्षी निधी मिळतो. हा निधी जिल्ह्याच्या गरजेनुसार विविध विकास कामांसाठी मंजूर केला जातो.
मतदारसंघातील गरजा ओळखून विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे, अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रस्ताव वेळेत सादर करणे, लोकांच्या प्रश्नांना प्राधान्याने मांडणे, मंजूर कामांची नियमित पाहणी करून दर्जा आणि प्रगती तपासणे, निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होत आहे यावर लक्ष ठेवणे अशा विविध समस्यांची सोडवणूक याकरिता समितीत सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
अनिताताई जगताप यांचे सासरे माजी सरपंच सोपानराव जगताप यांच्याकडून त्यांनी सामाजिक कामांची प्रेरणा घेतली. पती माजी उपनगराध्यक्ष विजयाराव जगताप यांच्यासोबत सामाजिक कामातून शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. वेळोवेळी आंदोलने देखील केली.
त्यांनी शिर्डी नगरपंचायत नगरसेविका, गटनेते व नगराध्यक्षा, साईबाबा संस्थान विश्वस्त, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, सहसंपर्कप्रमुख असे विविध पदांची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी छत्रपती मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवले आहेत.
त्यांची निवड झाल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे शिवसेनेच्या वतीने अनिताताई यांची निवड झाली.

