हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या फळबागेचे आर्थिक संरक्षण करा – दीपक गरगडे व श्रीमती राणी खर्डे यांचे आवाहन
इंदापूर: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ अंतर्गत डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू, सीताफळ व द्राक्ष या अधिसूचित फळपिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री. दीपक गरगडे तसेच मंडळ कृषी अधिकारी, बावडा श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी श्री. गरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी श्रीमती खर्डे यांच्या सूचनेनुसार बावडा मंडळातील सर्व कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमार्फत गावागावात फळपीक विमा योजनेची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. शेतकरी मेळावे, ग्रामसभा, शेतभेटी, माहिती फलक, पत्रके तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत अधिसूचित फळपिकांसाठी शासनाने निश्चित केलेल्या विमा संरक्षित रकमेवर अत्यल्प शेतकरी हिस्सा निश्चित करण्यात आला असून, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, तापमानातील तीव्र बदल, वेगवान वारे व इतर अधिसूचित हवामान जोखमीमुळे होणाऱ्या उत्पादनातील घटीस आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
पात्र शेतकऱ्यांनी विहित अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत माध्यमातून विमा प्रस्ताव सादर करावा. अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ उतारा, ८-अ, बँक खाते, फळबागेची नोंद व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज भरल्यानंतर पावती व अर्ज क्रमांक सुरक्षित जतन करून ठेवावा.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, बावडा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, इंदापूर येथे संपर्क साधावा.
"प्रतिकूल हवामानाचा धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र फळबाग उत्पादक शेतकऱ्याने हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या फळबागेचे आर्थिक संरक्षण करावे," असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री. दीपक गरगडे व मंडळ कृषी अधिकारी, बावडा श्रीमती राणी लक्ष्मण खर्डे यांनी केले आहे.

