पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आळंदी आणि देहू येथील इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीचे पाणी थेट पुलावरून वाहू लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आळंदी आणि देहू येथील नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले असून प्रशासनाने नागरिक आणि भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूरपरिस्थिती लक्षात घेऊन महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी आणि भाविकांनी नदीपात्र, घाट आणि पुलाजवळ गर्दी करू नये, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

