पळसदेव, ता. इंदापूर : गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेज, पळसदेव येथे पारंपरिक नागपंचमीचा सण उत्साह, आनंद आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व पारंपरिक सणांची विद्यार्थ्यांना ओळख करून देतानाच पर्यावरणातील सापांचे महत्त्व पटवून देणे, अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे होते. त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने वारुळाचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर श्री. विठ्ठल शिंदे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. नंदाताई बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, विभागप्रमुख श्री. प्रवीण मदने,सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फुगे, सौ. जयश्री लावंड यांच्यासह शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका सौ. सोजर काळे व सौ. माधुरी रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली वारुळाची आकर्षक व हुबेहूब प्रतिकृती तयार केली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
नागपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध पारंपरिक खेळ व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. फुगडी, झिम्मा, फेर धरणे आणि मेहंदी काढणे यांसारख्या पारंपरिक उपक्रमांनी शाळेचा परिसर आनंदाने फुलून गेला. महिला शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फेर धरत फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी पतंग उडविण्याचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांनाही पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पतंग उडवून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आणि संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाचे पालकवर्गातूनही उत्स्फूर्त कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देतानाच सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण करणारे असे उपक्रम दरवर्षी आयोजित करावेत, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. पालकांकडून या उपक्रमासाठी बक्षिसेही देण्यात आली.
प्री-प्रायमरीपासून इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी नागपंचमीच्या या आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, विविध खेळ, फुगडी-झिम्मा आणि आकाशात उंच भरारी घेणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांनी शाळेचा परिसर अक्षरशः उत्सवमय झाला.
कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना लाह्यांचा प्रसाद देऊन करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांनी सर्व महिला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
परंपरेची जपणूक, पर्यावरणाचे भान आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या त्रिवेणी संगमामुळे एल. जी. बनसुडे विद्यालयातील नागपंचमीचा उत्सव अविस्मरणीय ठरला.

