विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन
अकोले : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी शाडू माती तसेच गाईच्या शेणापासून (गोमयापासून) तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र गोरक्षण प्रमुख संतोष खामकर यांनी गणेशभक्तांना हे आवाहन केले. गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे नदी, तलाव व अन्य जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, तसेच पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शाडू माती आणि गोमयापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, पारंपरिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधता येतो. त्यामुळे गणेशभक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व पर्यावरणाला हानिकारक सजावटीचे साहित्य टाळून नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे खामकर यांनी नमूद केले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संतोष खामकर यांनी केले.
०००

