shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

चला गाठू या लक्ष्य’ या पुस्तकातून विद्यार्थ्यांना संघर्ष, आत्मविश्वास आणि सातत्याचा संदेश

श्रीरामपूर : परिस्थिती प्रतिकूल असली, आर्थिक अडचणी असल्या किंवा आयुष्यात अपयश आले तरी माणसाने आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नये. उलट आलेल्या अडचणींमधून प्रेरणा घेऊन स्वतःला घडवत राहिले, तर यशाचा मार्ग निश्चितपणे सापडतो. याची प्रेरणादायी प्रचिती श्रीरामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या जीवनप्रवासातून येते. स्वतःच्या संघर्षमय जीवनातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग विद्यार्थ्यांना आणि युवकांना व्हावा, या उद्देशाने त्यांनी ‘चला गाठू या लक्ष्य’ हे प्रेरणादायी पुस्तक लिहिले आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या चेतन लोखंडे यांचे बालपण आणि शिक्षण संघर्षमय परिस्थितीत झाले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच झाल्यामुळे ग्रामीण जीवनाशी त्यांची नाळ जोडली गेली. आई-वडिलांचे संस्कार, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र, विज्ञान शाखेतील शिक्षणाच्या वाटचालीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. अनेक जण अशा वेळी निराश होऊन शिक्षण सोडून देतात किंवा परिस्थितीला दोष देतात; मात्र लोखंडे यांनी अपयशाला शेवट मानले नाही.‘असे माझ्याच बाबतीत का घडत आहे?’ हा प्रश्न त्यांच्या मनाला सतावत होता. आर्थिक परिस्थितीही आव्हानात्मक होती. मात्र, याच मानसिक संघर्षातून त्यांनी स्वतःला पुन्हा उभे केले. दुसऱ्याच्या आधाराची वाट न पाहता स्वतःच स्वतःचा आधारवड बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

यानंतर त्यांनी बारावी कला शाखेत प्रवेश घेतला आणि उल्लेखनीय यश संपादन केले. पुढे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मराठी विषयातून M.A. पदवी संपादन केली. शिक्षणाची वाटचाल करत असतानाच मोठे ध्येय मनाशी बाळगून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अथक परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली.यानंतर सेवेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप निर्माण केली. आज ते श्रीरामपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. एका प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या विद्यार्थ्याने पोलीस अधिकारी म्हणून मिळवलेले हे यश अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

पुस्तकामागे आहे स्वतःच्या संघर्षाची प्रेरणा
चेतन लोखंडे यांच्या ‘चला गाठू या लक्ष्य’ या पुस्तकामागे त्यांचा स्वतःचा अनुभव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी आहे. पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी दहावीची परीक्षा झाल्यानंतरचा एक प्रसंग मांडला आहे. त्या काळात एका ‘मोटिवेशनल सेमिनार’ची जाहिरात पाहून त्यांना त्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा झाली होती. मात्र, कार्यक्रमासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना त्या वेळी ते शक्य झाले नाही.या छोट्याशा प्रसंगाने त्यांच्या मनावर मोठा परिणाम केला. आजही आपल्यासारखे अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे प्रेरणादायी कार्यक्रम, मार्गदर्शन किंवा ज्ञानापासून वंचित राहत असतील, असा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. याच भावनेतून विद्यार्थ्यांच्या हातात महागडे ज्ञान विकत घेण्याऐवजी पुस्तकाच्या रूपाने एक ‘शब्दरूपी प्रेरणास्रोत’ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.हे पुस्तक केवळ स्वतःचे अनुभव सांगणारे पुस्तक नसून, अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा उभे करण्याचा आणि त्यांच्या मनात ध्येयाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या मनोगतातून स्पष्ट होते.

नशिबाला दोष देऊ नका’ हा संदेश

आज अनेक विद्यार्थी अपयश आले की आत्मविश्वास गमावून बसतात. काही जण प्रयत्न करणे थांबवतात, तर काही जण आपल्या अपयशाचे कारण नशिबाला देतात. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी ‘चला गाठू या लक्ष्य’ या पुस्तकातून आत्मविश्वासाचा संदेश देण्यात आला आहे.परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे, हा त्यांच्या जीवनप्रवासातून मिळणारा महत्त्वाचा संदेश आहे.
स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना त्यांनी अडथळे न मानता त्याच अडचणींना आपल्या यशाची पायरी बनवले. त्यामुळेच त्यांच्या पुस्तकातील विचार हे केवळ पुस्तकातील शब्द न राहता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत.

विद्यार्थ्यांसाठी ‘शब्दरूपी प्रेरणास्रोत’
‘चला गाठू या लक्ष्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करण्यासाठी, त्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली आहे.

“माझ्यासारखी अनेकांची गत असावी. त्यांच्या यशासाठी प्रेरित करणारे ज्ञान विकत घेण्याची ऐपत नाही. त्यांच्यासाठी या पुस्तकाच्या रूपाने एक मोठा शब्दरूपी प्रेरणास्रोत त्यांच्या हाती देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना चेतन लोखंडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे.

त्यांच्या मते, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आणि लक्ष्यावर लक्ष केंद्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अडचणी आल्या म्हणून थांबायचे नाही, तर त्यातून शिकत पुढे जायचे, हा विचार पुस्तकातून मांडण्यात आला आहे.

स्वतः अधिकारी झाले; आता युवकांना घडवण्याचा प्रयत्न
चेतन लोखंडे यांच्या जीवनातील विशेष बाब म्हणजे स्वतःच्या संघर्षातून अधिकारी झाल्यानंतर त्यांनी आपला अनुभव स्वतःपुरता मर्यादित ठेवलेला नाही. विद्यार्थ्यांना आणि युवकांना प्रेरणा मिळावी, त्यांनी शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे, यासाठी ते सातत्याने प्रेरणादायी विचार मांडत आहेत.
एकेकाळी मोटिवेशनल सेमिनारला जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्तीने पुढे स्वतः अधिकारी झाल्यानंतर युवकांसाठी प्रेरणादायी पुस्तक लिहिणे, ही त्यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाची परिवर्तनाची बाजू आहे.
त्यांच्या या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की, परिस्थिती माणसाला थांबवू शकते; पण माणसाची जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्य त्याला पुन्हा उभे करू शकते.

संघर्षातून यशापर्यंतची वाटचाल युवकांसाठी आदर्श

ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन, अपयशाचा सामना करून, आर्थिक परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस अधिकारी होण्यापर्यंतचा चेतन लोखंडे यांचा प्रवास हा युवकांसाठी निश्चितच आदर्श आहे.त्यांच्या या वाटचालीत आई-वडिलांचे संस्कार, गुरुजनांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत, आत्मविश्वास, धैर्य आणि चिकाटी या सर्वांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच त्यांची कथा केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या यशाची कथा नसून ‘अपयशातून यशाकडे कसे जाता येते’ याचा प्रेरणादायी धडा आहे.
    आज श्रीरामपूर पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी युवकांच्या हातात ‘चला गाठू या लक्ष्य’च्या माध्यमातून प्रेरणेचे पुस्तक दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि युवकांनी स्वागत करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
         “नक्की लक्ष्य गाठणार हे शाश्वत सत्य आहे. सातत्यपूर्ण वाटचाल करणे आणि लक्ष्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे,” हा त्यांच्या पुस्तकातून मिळणारा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करण्यासारखा आहे.अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्यांना उभारी देणे, यशासाठी वाटचाल करणाऱ्या युवकांना प्रेरणा देणे आणि प्रत्येकाने आपले ठरवलेले लक्ष्य गाठावे.
0000
close