shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्या निकेतन फार्मसी कॉलेज, लाखेवाड़ी आणि बायोसाइट रिसर्च लेबोरेटरी, सांगली मध्ये पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार

विद्या निकेतन फार्मसी कॉलेज, लाखेवाड़ी आणि बायोसाइट रिसर्च लेबोरेटरी, सांगली मध्ये पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार
इंदापूर - लाखेवाडी, दि. ८ : विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर फार्मसी क्षेत्रातील करिअर संबधी माहिती मिळावी, तसेच संशोधन व उद्योग क्षेत्राशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क वाढावा, या उद्देशाने महाविद्यालयमध्ये करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘Exploration of Pharmacology’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रासाठी Biocyte Institute of Research Laboratory चे संचालक डॉ. संदीप पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्माकॉलॉजी विषयाचे विस्तृत कार्यक्षेत्र तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, क्लिनिकल रिसर्च, शैक्षणिक क्षेत्र आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी प्राप्त करण्यापुरते मर्यादित न राहता संशोधन कौशल्य, तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. संदीप पाटील यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तज्ज्ञांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फार्माकॉलॉजी, संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या विविध पैलूंबाबत माहिती जाणून घेतली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फार्माकॉलॉजी व संशोधन क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत अधिक स्पष्ट दिशा मिळाली.

पाच वर्षांसाठी सामंजस्य करार

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासाला अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी आणि Biocyte Research Laboratory, Sangli यांच्यात पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या करारामुळे बी. फार्मसी तसेच एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक अनुभव, प्रकल्पकार्य आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकास यांसारख्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालय आणि संशोधन संस्था यांच्यातील हा शैक्षणिक समन्वय विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच त्यांच्या भविष्यातील करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले मॅडम, प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव सर, सचिव हर्षवर्धन खाडे, विश्वस्त ऋषिकेश ढोले तसेच प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर सर यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
close