जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या वरील अभंगातून पर्यावरण रक्षणाचा फार मोठा उपदेश केलेला आहे.
मात्र सद्याच्या तथाकथित बुद्धिजीवी मंडळींनी पर्यावरण कसे नासविले जाईल यासाठीच या रचनेला बदनाम केलेले आहे की काय असेच वाटते.
तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ काहीजण
"असेल माझा हरी! तर देईल खाटल्यावरी !!"
असा सर्वस्वी चुकीचा लावतात. माणसाला आळशी बनवण्यासाठी अभंगाचा असा चुकीचा अर्थ काढला जातो.
चंगळवाद, स्वैराचार आणि स्वार्थ सांभाळण्यासाठी सुधारणेच्या नावाने प्रदूषणाचे साम्राज्य वाढवीत आजवर आपण स्वतःला पुढारलेले समजून घेण्यात धन्यता मानत आहोत.पण आता सुधारणे हे आवश्यक झालेले आहे.कारण भरभरून देणारा निसर्ग आपल्याला प्राणवायूसाठी पैसे मोजायला लावत आहे.
तुकाराम महाराज या अभंगातून असे सांगतात की परमेश्वराने आपल्याला जे जन्मजात ऐश्वर्य, आरोग्य दिलेले आहे ते तसेच रहावे .
म्हणजे कसे ?
अनंते म्हणजे परमेश्वराने मला हात, पाय आदी पंचज्ञानेंद्रीये, पंचकर्मेंद्रिये दिलेली आहेत. निसर्गसंपत्ती, शरीरसंपदा,खनिजसंपत्ती,जलसंपत्ती, परंपरा, मातृपितृछत्र असे खूप काही दिलेले आहे. ते सारे अबाधित रहावे. हे केवळ अबाधित राहावे. तैसेची रहावे.
यापुढे महाराज म्हणतात की त्यातून समाधान मिळावे. चित्ताचे समाधान म्हणजे आनंद. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याचेआई-बाप, बंधू-भगिनीं, आप्तस्वकीय, नातेवाईक , गावकरी, देशातील लोक हे सर्व आनंदित राहून त्यातून प्रगती करणे म्हणजे समाधान...!
घरामध्ये भरपूर संपत्ती येत आहे आहे आणि आपलाच एक बंधू दारू पिऊन गावभर धिंगाणा घालतोय, शिवीगाळी करतोय, बायकोला हाणामारी करतोय नि समाज त्याची अवहेलना करतोय. असे चित्र जर घरात असेल तर तिथे आनंद, समाधान असेल काय?
यासाठी समाज निर्व्यसनीअसावा. संपत्ती मिळवीत असताना त्यातून समाजकल्याण होत नसेल, समाधान प्राप्त होत नसेल तर ती संपत्ती कूचकामी ठरते. ती माणसाला विनाशकारी बनविते.
यासाठी प्रगती करीत असताना सर्वसमावेशक कल्याण जोपासत राहणे यास जगतगुरु तुकाराम महाराज समाधान असे म्हणतात.
आता समाधान याचा अर्थ समजून घेताना दुसऱ्याचा मत्सर नको. दुसऱ्याला त्रास नको. दुसऱ्याला ओरडणे दुःख देणे, लूबाडून खाणे असं काही होऊ नये. आपल्याला जे मिळते ते दुसऱ्याला देखील मिळायला हवे. तुकाराम महाराजांच्या शिकवणीनुसार सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे केवळ समाधान होय.
मात्र आपण हा नियम पाळत नाही. कधीही उठतो, कधीही जेवतो, कधीही झोपतो. निसर्ग नियम तोडतो. अगदी सहजतेने कोणताही विचार न करता प्रदूषण करतो, नद्यां नासवतो, घरबांधणीसाठी झाडे तोडतो, नि घरामध्ये जागोजागी वातानुकुलित यंत्रणा बसवून वायू प्रदूषण करीत तापमान वाढवतो, गाड्यांचा धूर, प्लास्टिकचा कचरा करतो. अगदी बिनदिक्कतपणे निसर्ग नियम पायदळी तुडवतो. क्षणिक सुखासाठी आणि बडेजाव मिळवण्यासाठी आपली सगळी धडपड असते. मात्र हे सर्व करत असताना आपणच आपले दीर्घकालीन नुकसान करून घेत असतो. त्यामुळे निसर्ग आपल्याला साहाय्य करत नाही आणि आपले आरोग्य बिघडते.
पर्यावरणाचे देखील असेच आहे.
विश्वाची रचना म्हणजे ठेविले अनंते! परमेश्वराने जसे ठेवले असेल त्यात काहीही बदल करू नये. म्हणजे तैसेची रहावे आणि सदैव समाधानी जगावे म्हणजे चित्ती असू द्यावे समाधान!अत्यंत हव्यासापोटी आपण हे संतुलन बिघडवतो आहोत नि स्वतःला विनाशाकडे घेऊन जात आहोत.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत...पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१ असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान.