सौ.संध्या शिंदे यांचे अकाली निधन वेदनादायी..!!
राहुरी: दैव जात दुःखे भरता दोष ना कुणा9चा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!असे आपण नेहमीच म्हणतो, किंबहुना आपण मानतोही!मात्र माणसाच्या आयुष्यात काही घटना आपल्या डोळ्यासमोर अशा घडतात की देवावर असलेल्या आपल्या श्रद्धेला क्षणभर का होईना तडा गेल्याशिवाय राहात नाही.
देवळाली प्रवरा शहर कर्मभूमी तर टाकळीमियाँ जन्मभूमी असणारे डॉ. दादासाहेब शिंदे व यांच्या धर्मपत्नी सौ.संध्या शिंदे गेली 15 वर्ष अखंडपणे देवळाली पंचक्रोशीतील सर्वसामान्य लोकांना त्यांचे आजारपणात कुटुंबातील डॉक्टर व्यक्ती अशी भावना जिव्हाळा निर्माण करणारे हे दाम्पत्य!स्व.सौ.संध्या या डॉक्टर नसल्यातरी आपल्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्नाना नेहमीच हसतमुखाने दिलासा देण्याची त्यांची सवय असल्याने आलेला रुग्ण डॉ. दादासाहेब शिंदे बरोबरच सौ.संध्या शिंदे यांच्याशी कौटुंबिक म्हणून जोडला गेला.
गेल्या वर्षांपासून जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोना काळात पंचक्रोशीतील अनेक रुग्ण डॉ. शिंदेंनी ठणठणीत केले. याच दरम्यान साधारण दोन महिन्यांपूर्वी शिंदे दाम्पत्य कोरोना ग्रस्त झाले.स्वतः डॉक्टर या आजारातून झटपट सावरले मात्र संध्या ताई कोरोना मुक्त होवून ही आजाराने त्यांचा पूर्ण पिच्छा पुरवला.संध्या ताई सोनईच्या शेटे परिवाराच्या जेष्ठ कन्या त्यांचे भाऊ वैभव हे देखील डॉक्टर असल्याने आपली बहिणीच्या उपचारात त्यांनीही कसलीच कसर ठेवली नाही.डॉ. दादासाहेब शिंदे गेली दोन महिने आपल्या पत्नीचा उपचारार्थ पुण्यात तळ ठोकून रात्रंदिवस आपल्या पत्नीला बरे करण्यासाठी प्रयत्नांची सर्वोतोपरी पराकाष्ठा करीत असतानाच या दाम्पत्याचे अनेक चाहते आपापल्या देवता समोर संध्या ताईच्या जीवितासाठी प्रार्थना करत होते.मात्र नियतीने आपला डाव साधलाच आज सोमवार दि.21 रोजी सकाळी संध्या ताईला आपल्या मधून हिरावून नेले.
खरं तर या भूतलावर आलेला माणूस हा कधी ना कधी जाणार आहे हे त्रिकाल सत्य आहे मात्र मग कधी कधी प्रश्न निर्माण होतो खरच देव इतका निष्ठुर असू शकतो? सदैव समाज सेवेची भावना असणारे डॉ. दादासाहेब शिंदे,त्यांची दोन निरागस बालके पाहून तर माझ्या सह अनेकांना हा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही.खरंच का हो देव इतका निष्ठुर असू शकतो?
स्व.संध्याताई दादासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
➡️दिपक हरिश्चंद्रे- पत्रकार, खडांबे (वांबोरी प्रतिनिधी)