युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर, १३ नवोदित चेहऱ्यांना संधी..
प्रतिनिधी :संजय वायकर
अ .नगर (दि .२२ ): नगर तालुका हा काँग्रेस विचारांना मानणारा तालुका आहे. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काँग्रेसचे मोठे काम राहिलेले आहे. विधानसभा मतदारसंघांच्या नवीन रचनेमध्ये तालुक्याचे तीन भाग झाले असले तरी देखील तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण करावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक तथा अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.
नगर तालुका युवक काँग्रेसची कार्यकारणी तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय उलट यांनी युवकांच्या बैठकीमध्ये जाहीर केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरण काळे बोलत होते.यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित जगताप पाटील, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, सुभाषराव ढेपे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, महसूल सारखे जनसामान्यांच्या प्रश्नांची निगडित असणारे अत्यंत महत्त्वाचे खाते ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. या खात्याच्या माध्यमातून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यात करण्याची मोहीम पदाधिकाऱ्यांनी हाती घ्यावी.
तालुक्याचे विभाजन झाल्यामुळे तालुक्यात एकखांबी खंबीर नेतृत्व राहिलेले नाही. कार्यकर्त्यांना नेमकी कुठली वाट धरू याचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये असतो. परंतु युवक काँग्रेसने अशा नवीन नवोदित नेतृत्वाला व्यासपीठ देत आपल्या गाव, पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट आणि तालुक्यात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. तालुक्यातील युवाशक्तीच्या पाठीशी ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांची ताकद उभी करण्याचे काम पक्षाच्या वतीने केले जाईल, असे यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट म्हणाले की, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतभाऊ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यामध्ये काँग्रेस संघटन मजबूत करण्याचे काम युवकांच्या माध्यमातून आगामी काळात केले जाईल. यावेळी सुभाष ढेपे सर, सुजित जगताप आदींची भाषणे झाली.
तालुका युवक काँग्रेस कार्यकारणी मध्ये १३ नवोदित चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये अध्यक्षांसह दोन उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, एक सचिव, तीन सहसचिव, दोन संघटकांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - ॲड. अक्षय भिमराज कुलट, उपाध्यक्ष - विशाल शिवाजी घोलप, प्रशांत उत्तम ठोंबरे, सरचिटणीस - साहिल मुनीर शेख, सोमनाथ बाळासाहेब गुलदगड, नितीन सुरेश ढेपे, सचिव - प्रज्योत बबन सातपुते, सहसचिव - श्रीहरी सोमनाथ गिरवले, जय विजयराव शिंदे, अंकुश बापू गव्हाणे, संघटक - अक्षय बापू पाचारणे, आजिनाथ शंकर कर्डिले.
नगर तालुका युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस, एनएसयूआयचे जिल्हा समन्वयक तथा अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित जगताप पाटील, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, सुभाषराव ढेपे सर आदी उपस्थित होते.