shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेरणास्रोत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम..

देशाच्या सर्वोच्च पदावर कार्य करतांना देशाची उर्जा ठरणाऱ्या तरुणांना सातत्याने प्रेरणा देण्याचे प्रभाविपणे कार्य करणाऱ्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांची जयंती ही सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.वाचनाने मनुष्य समृद्ध होत असतो हा समान धागा पकडून शालेय शिक्षणमंत्री महोदयांनी बालवयापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी महान व्यक्तींचे महान आदर्श डोळ्यासमोर तेजोदिप सारखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीविकासाचा पाया हा शिक्षण आहे.याच विद्यार्थीदशेत सकारात्मकतेचा ठसा उमटवणारे वाचन झाले तर समृद्ध बुद्धीने तयार झालेला तरुण महाराष्ट्राला एकूणच देशाला मिळणार आहे.शिक्षणाचे मर्म बालवयापासूनच मिळावे म्हणून राज्य शासनाने सुरु केलेला वैचारिक उपक्रम म्हणजे वाचन प्रेरणा दिन होय.
भारत देशाला २०२० मध्ये महासत्ताकाचे स्वप्न दाखवून त्या दिशेने संपूर्ण तरुणाईला देशासाठी एकत्र येण्याची हाक देणारे देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस..

राज्यभरातील सर्वच शैक्षणिक संस्थांमधून अर्थात माळरानांतील तांड्यावरील शाळेपासून तर अगदी वातानूकुलीत शैक्षणिक संस्थेमधील शाळांमध्ये वाचन् प्रेरणा दिन साजरा होण्याचे हे आठवे वर्ष. प्रेरणादायी ए.पी.जे.भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांच्यापुर्वीचा राष्ट्रपतीपदाचा मान हा दिल्लीतील शाही महाल,मोठी गणली जाणारी व्यक्ती यांचेपुरता मर्यादित स्वरूपाचा होता.मात्र कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी कोणताही लवाजमा व इतर अवाजवी गोष्टींना जवळ नं करता समाजासाठी आणि त्यातील तरुण वर्गांना आपण विश्वास दिला तर मोठ्या उत्साहाने हा तरूण देशाचा पाईक होईल हा विचार करून तरुणांसाठी दीपस्तंभासारखे कार्य केले एवढेच नव्हे तर त्यांचे लहान बालंकामध्ये  मिसळणे हे बालकांना आपलेसे करून गेले 
               
भारतरत्न डॉ. ए. पी. जे अर्थात अबुल पाकीर जैनुलआबेदिन अब्दुल कलाम यांचा एकूणच सर्व जीवनप्रवास म्हणजेच आव्हाने पेलत केलेली एक वाटचालच आहे. बालपणीच वडिलांचे मित्र ,रामेश्वरमचा  परिसर, पवित्र शिवमंदिराची ख्याती तसेच वडिलांचे मस्जीदमध्ये  नमाजासाठी जाने हे कसे एक आहे असा विशाल विचार त्यांच्या मनावर कोरला गेला होता.आई वडील यांचे कष्ठमय व प्रामाणिक तत्वांवर चालणारे त्यांच्यासमोरील जीवन अनुभवायला कलाम यांना मिळाले.भ्रष्टाचाराचा लवलेशही नसलेल्या वडीलांच्या विचारांच्या आदर्शांना समोर ठेवत तंतोतंत तेच विचार स्वतःमध्ये उतरविण्याचा प्रयत्न कलाम यांनी केला. राष्ट्रपती काळातील कलाम यांच्या विविध अनुभवावरून आपणास हे सर्व अनुभवयास मिळते.त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात त्यांच्या वडिलाचे मुलभूत सत्ये सांगणारी विचार शक्ती सातत्त्याने प्रकाशाच्या ज्योतीसारखे तेवत राहिली. तेच विचार कलाम यांना दु:ख, अपयश, निराशा, अन अंधारातही वाट दाखवू शकल्याचे कलाम त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात.

कलाम यांच्या संपूर्ण प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या अग्निपंख या अनुवादित पुस्तकामधून नवतरुणाना सातत्त्याने सकारात्मक विचार खुणावतो,जीवनातील प्रत्येक प्रसंगांना धैर्याने सामोरे जायला शिकवतो. बालकप्रेमी राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम सर्वांना परिचित होते कोणताही समारंभ असेल तर त्या ठिकाणी दोनपैकी एक गोष्ट असणे हे क्रमप्राप्तच असायचे त्यापैकी एक म्हणजे विद्यार्थी आणि दुसरे विज्ञान हे ठरलेलेच.
       
डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम यांचे अनमोल असे विचारधन तरुणांना नेहमी उभारी देण्याचे कार्य करतात. उदा. जे लोक स्वप्ने पाहतात व त्यानुसार कार्य करतात,त्यांना अखिल विश्वाचा स्नेह व सर्वोत्तम साहाय्य लाभते.शिक्षण हि ज्ञान व सुजाणतेच्या मार्गावरील अनंत यात्रा आहे.अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकणारे तीन अतिशय महत्वाचे सामाजिक घटक म्हणजे मत,पिता व शिक्षक होत अशा काही सुविचारांचा त्यात समावेश होतो.
        
भारत देशावर निस्सिम प्रेम करणारे कलाम त्यांच्या जीवनात काही बदल घडविणारे प्रसंग सांगताना देशाबद्दल मोठा विश्वास व्यक्त करतात,ते म्हणतात माझ्या देशातील साध्यासुध्या लोकांच्या निष्पाप वागण्यात जी जन्मजात बुद्धिमत्ता व उमज आहे, त्याने मला नेहमी विश्वास वाटतो कि माझा देश जगाला शांततेच्या मार्गावर घेऊन जाईल.
       
 शासकीय पदाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीबद्दल कलाम सातत्याने सांगत, अशा व्यक्तीने त्यांच्याकडे मदत मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणतीही भेट स्वीकारू नये , स्वीकारल्याने त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली येऊन त्याच्या हातन शासकीय कार्य बजावताना चुकीचे कार्यही घडू शकते.
         
आपण असे कार्य करावे कि त्या कार्याने आपली मान उंचावी, शरमेने मान खाली घालावी लागेल असे कृत्य कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही क्षेत्रात घडू नये.कलाम यांचे हे वाक्य तर स्वाभिमान शिकवणारेच ठरते.
         
जीवनातील चढउतारामध्ये त्यांच्या विचाराची जिद्द,कामातील चिकाटी आज थोड्याशा पराभवाने खचून जाणारे व परिस्थितीचा मुकाबला न करणा-या तरुणांना प्रेरणादायी आहे.
          
जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे माता, पिता व शिक्षक यांना शीर्षस्थानी मानणारे कलाम भ्रष्टाचार हा सद्सदविवेके बुद्धीवरचा हिंस्त्र हल्ला मानतात. अशा या सद्सदविवेकेबुद्धीची मशागत करताना जीवनात स्वतः जिंकण्यापेक्षा ते इतरांना जिंकण्यासाठी सहाय्य करणे महत्त्वाचे असे म्हणतात , त्यापुढे ईर्षेला जागा शिल्लक राहत नाही. कारण ईर्षेचा अतिरेक हा ऱ्हासाकडे नेण्याचा मार्ग ठरू शकतो.
            
कोणताही देश त्या देशातील नागरीकांसारखाच असतो, देशाच्या जडणघडणीतच त्या देशातील नागरिकांची नैतिक मुल्ये, जीवनमूल्ये व चारित्र्य प्रतिबिंबित होते. देशातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचे चरित्रांचे वाचन मनुष्याच्या विचारात समृद्धता आणते.
           
तरुणाईचा मोठा समावेश असणाऱ्या मानवी साधनसंपत्तीचा महासागर ही आपल्या देशाची अद्वितीय ताकद असल्याने या सुसंस्कृत विचाराची कास धरावी आणि बलशाली भारत देशाला जगात सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प तरुणांसह सर्वांकडून डॉ. कलाम यांनी ‘ मिलेनियन मिशन २०२०’ मध्ये दाखवलेला विकसित भारत घडविण्याचे भव्य दिव्य स्वप्न साकार करूया.

निसर्गातील सहज सौंदर्याचा सुखद उद्गार म्हणजे कला,व्यंगचित्र,शिल्परचना असो वा साहित्य यांची अनुभूती घेणाऱ्या व आनंद लुटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ते अतिशय सुंदर जीवन चैतन्य फुलवते.असे चैतन्य प्रेम,हास्य,स्नेह व शांती यांचा संदेश मूकपणे पण परिणामकारकरित्या पसरवते.वाचन ही सुद्धा यांपैकीच आहे,अशा या प्रेरणादायी वाचनामुळे नक्कीच सुसंस्कृत,सकारात्मक विचार करणारा,सर्व बाबींना धैर्याने सामोरे जाणारा तरुण निर्माण तयार होईल असा विश्वास वाटतो.देशाला स्वकर्तृत्वाची वेगळी ओळख करून देणाऱ्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांची जयंती ही येथून पुढील सततच्या वाचनातून प्रेरणादायीच ठरेल असे निश्चित वाटते.

सौ.महेजबीन शकील बागवान
श्रीरामपूर जि.अहमदनगर. 
मो.न.९६ २३ ४६ ४७ ३७

वृत्त संकलन: 
शौकतभाई शेख - श्रीरामपूर
close