सोलापूर । प्रतिनिधी :
तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रात एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत.काहींना तर त्यांच्या नावाची धडकीच भरते.असे कर्तव्य दक्ष अधिकारी फारच कमी आढळतात.
17 नोव्हेंबर 2014 या दिवसापासून पुढचे 17 महिने सोलापूर जिल्ह्यात वादळ येणार होते आणि ते वादळ आणलं होतं तुकाराम मुंढे यांच्या रूपाने..! वर्षानुवर्षे वाळू तस्करीच्या माध्यमातून मलई खाणाऱ्यांना तुकाराम मुंढे भिडले आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. यात काही असे नेते होते ज्यांनी तुकाराम मुंढेच्या बेधडक कारवाईला आवाहन दिले, जाहीरपणे शिवीगाळही केली. पण तुकाराम मुंढेनी जिल्हाधिकाऱ्याची ताकद काय असते ते सोलापूर जिल्ह्यात कदाचित पहिल्यांदाच दाखवली. आणि, कायद्यांना केराची टोपली दाखवणाऱ्यांचा त्यांनी जालीम इलाज तर केलाच. पण तीनजण त्यांच्या हिटलिस्टवर आले. आणि या तीनजणांना मुंढेशी नडनं एवढे महागात पडले की, पुढे त्यांच्या आयुष्याचा नकाशाच बदलून गेला. तुकाराम मुंढेंना आता शिंदे सरकारने मोठी जबाबदारी दिली आह. पण सोलापुरात असताना 17 महिन्यात पाचशे बैठका आणि फक्त चार रजा घेणाऱ्या तुकाराम मुंढेंनी ज्या नेत्यांच्या आयुष्याचा ट्रॅक बदलला जाणून घ्या त्यांच्याविषयी...
17 नोव्हेंबर 2014 ला पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा मोहोळ मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासोबत पहिला सामना झाला. रमेश कदम यांनी मतदारसंघातील लोकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुकाराम मुंढे विरोधात आंदोलन केले. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा होत असताना, कदम तिथे गेले आणि त्याने वाळूचा बंद पाडला तिथे उपस्थित असलेले तलाठी यांनाही मारहाण केल्याचा आरोप झाला. ही बाब तुकाराम मुंढेच्या कानावर गेली आणि ते संतापले, आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. यापुढे विविध कारणांवरून दोघांचे खटके उडत राहिले. तर, वाळू वाहतुकीमुळे मतदार संघातले रस्ते खराब होत असल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला व त्यांचा आरोप तुकाराम मुंढेंसमोर टिकू शकला नाही. वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब होत असतील तर कदम यांनी सरकार दरबारी जाऊन धोरण बदलून आणावे, आम्ही त्यानुसार कारवाई करू पण कोणी कितीही मोठा असला तरी त्यांना कायदा हातात घेता येणार नाही. असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला. प्रत्येक पातळीवर रमेश कदम यांना तुकाराम मुंढे भारी पडले, तद्नंतर रमेश कदम स्वतः एका संकटात सापडले आणि त्यांना राज्य शासनाच्या अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात जावे लागले.
सोलापूर मध्ये वाळू ठेकेदारीत अभिजीत पाटील हे मोठे नाव होते. तुकाराम मुंढे यांच्या नजरेतून त्या काळात अवैधपणे वाळू तस्करी करणारा एकही ठेकेदार सुटला नव्हता आणि अभिजीत पाटीलही त्यांच्या रडारवर आले. अभिजीत पाटलांच्याभोवती तुकाराम मुंडेने सर्वात मोठा फास टाकला आणि थेट अटकेची कारवाई केली. अभिजीत पाटील यांना जवळपास तीन महिने तुरुंगात टाकण्यात आले. तर, वाळू ठेकेदारांमध्ये दहशत निर्माण करणार ही कारवाई होती. कुणीही असला तरी कायदा मोडल्यानंतर तो सुटणार नाही हे सांगणारी ही कारवाई होती. या कारवाईने अभिजीत पाटलांच्या आयुष्याचा ट्रॅक बदलून टाकला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिजीत पाटलांनी सहकार क्षेत्रातील कारखान्यांचा जाळ उभारलं ते आता पाच कारखान्याचे मालक आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर आल्यामुळे एक युवा नेता नुकताच चर्चेत आला. त्याचे नाव होते, शरद कोळी..! शरद कोळी हा सुद्धा वाळू ठेकेदारीतील मोठे नाव होते. शरद कोळीने वाळू व्यवसायातून पैसा कमावला पण तुकाराम मुंढे सोलापूरला गेले आणि शरद कोळीचा पडता काळ सुरू झाला. शरद कोळीवर गुन्हे दाखल झाले तुकाराम मुंढे यांच्या नजरेतून कोणीही सुटलं नाही आणि शरद कोळीचाही त्यात नंबर होता. शरद कोळीला सोलापूर उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातला इंदापूरच्या अश्या दोन जिल्हा आणि एका तालुक्यातून हद्दपार करण्यात आले. या कारवाईनंतर शरद कोळी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
अश्याप्रकारे, तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई केल्या. पण त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जी प्रशासकीय दहशत निर्माण केली. त्याने मोठमोठी ठेकेदारही हादरून गेले. तसेच, राज्यकर्त्यांना त्याचा त्रास व्हायला लागला, नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचे सत्ताधाऱ्यांसोबत खटके उडाले. सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि तुकाराम मुंढे हे सिद्धेश्वर यात्रेवरून आपने सामने आले. जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेले निर्बंध पालकमंत्र्यांना पटले नाहीत आणि हे संबंध बिघडतच गेले. असे असलं तरी ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समध्ये होते. तुकाराम मुंढे यांच्या कामाची शैली पाहून प्रभावीत झालेले फडणवीस यांनी, चार वेळा सोलापूरचा दौरा केला आणि बैठका घेतल्या. तुकाराम मुंढेंनी स्वतःला झोकून देत काम केले.
तर, 17 महिन्यांच्या आव्हानात्मक कारकिर्दीत त्यांनी 500 बैठका घेतल्या प्रशासनामध्ये शिस्त आणली व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे विसरून गेलेले तुकाराम मुंढेनी 17 महिन्यात फक्त चार रजा घेतल्या.
सोलापूर महापालिका आयुक्त रजेवर गेले असताना तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्त म्हणून अल्पकाळ पदभार होता. या अल्पविराम मुदतीत मुंढे यांनी थकबाकी कर वसुलीसाठी धडक मोहीम राबवून, सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत भरभराट आणली. सोलापूर शहराला होत असलेला विस्कळीत पाणीपुरवठा सहा दिवसांवरून चार दिवसांवर आणला. पण जून 2016 मध्ये त्यांची बदली झाली.
सोलापूरात कार्यरत असताना त्यांच्या कामाची पावती म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. सोलापूर नंतर तुकाराम मुंढे यांचा राजकारण्यांनी धसकाच घेतला. त्यांची प्रत्येक कारकीर्द गाजली मग ती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असो अथवा नाशिक किंवा नागपूर महापालिकेच्या आयुक्त..! राज्यकर्त्यांना नकोसे झालेले तुकाराम मुंढे मुंबई मंत्रालयात परतले आहेत. आता त्यांना शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेची जबाबदारी दिली आहे. राज्यातल्या सरकारी दवाखान्याची अवस्था आणि आरोग्यवस्था हे सुधरवण्यासाठी तुकाराम मुंढें सारख्याच अधिकाऱ्यांची गरज होती हीच व्यवस्था सुधारण्याचे आवाहन आता त्यांच्या समोर आहे. म्हणून अशा कर्तव्य दक्ष अधिकारी यांना जनतेने नेहमीच सहकार्य केले पाहिजे.. आणि त्यांच्या धडाकेबाज कामगिरीला चालना दिली पाहिजे.