एकदिवसीय सामन्यांच्या तेराव्या विश्वचषकाचा बिगुल गुरूवारी अहमदाबादेत सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थित गतविजेते इंग्लंड व उपविजेते न्यूझिलंड यांच्या सामन्याने वाजेल आणि भारतात क्रिकेटचे महाकुंभ सुरू होईल. त्यानंतर पुढील दिड महिना भारतातील वातावरण संपूर्णतः क्रिकेटमय होऊन जाईल. या दरम्यान प्रत्यक्ष अंतिम सामन्यापूर्वी कोणता संघ विश्वजेता होईल यावर अनेक ठिकाणी काथ्याकूट, चर्चासत्र व वादविवादही होतील. प्रत्येकाचा संभावित विजेता वेगवेगळा संघ असेल. पण प्रत्येक भारतीयाला यजमान भारतच विजेता बनेल असा विश्वास वाटतोय. याला जगातल्या अनेक क्रिकेट पंडित व माजी क्रिकेटपटूंनी दुजोरा दिल्याने टिम इंडियाच्या समर्थकांत नवीन जोष चांगलाच उफाळून वर आला आहे. त्याचे कारणेही तितकेच समर्पक असल्याने भारताच्या संभावित विजेतेपदाला सर्वांकडून जणू मान्यताच मिळत आहे.
सन १९८७, १९९६, २०११ व आता २०२३ असे एकूण चौथ्यांदा भारत वनडे विश्वचषकाचे आयोजन करत असून सन २०११ मध्ये भारताने विजेतेपद मिळवून स्वतःच्या आयोजनात विजेतेपद मिळविणारा पहिला यजमान होण्याचा मान प्राप्त केला आणि यजमान संघ विश्वचषक जिंकत नाही हा भ्रमही खोटा ठरविला. भारताच्या या मायभूमितील यशानंतर यजमान संघ जिंकण्याची जणू परंपराच सुरू झाली. भारतानंतर सन २०१५- ऑस्ट्रेलिया व सन २०१९ इंग्लंडने आपल्या आयोजनात यश मिळवून या अनोखी परंपरा राखली. आता परत एकदा भारत तोच कित्ता गिरवितो का ? हे बघणे मनोरंजक ठरेल.
मागील काही महिन्यांपासून भारताचे प्रमुख खेळाडू जसप्रित बुमराहा, के.एल राहुल, श्रेयस अय्यर, प्रसिध्द कृष्णा, रिषभ पंत हे अनफिट असल्याने भारतीय संघाला सेवा देऊ शकत नसल्याने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक नव्हती. तरीही नवोदित व जुन्या खेळाडूंनी भारताची शान राखण्याचा अतोनात प्रयत्न करून आयसीसी मानांकनात कसोटी व टि-२०मध्ये अव्वल स्थान पटकविले. नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत रिषभ पंत सोडून इतर प्रमुख खेळाडू संघात परतले. तसेच कुलदिप यादव आपल्या जुन्यी लयीत आल्याने संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली. याचा परिपाक म्हणजे भारताने आशिया चषकाचे विजेतेपद मिळविले आणि त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत धुळ चारून वनडेतही आयसीसीचे अव्वल मानांकन मिळवून क्रिकेटच्या तिनही प्रारूपात प्रथम स्थान प्राप्त केले. अशी कामगिरी पार पाडणारा भारत क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासातला दुसरा देश ठरला.
या अद्वितीय कामगिरीमुळे भारतीय संघ व खेळाडूंविषयी प्रत्येक क्रिकेट रसिक व पंडितांच्या मनात आदराचे निर्माण झाले. यापैकी अनेकांनी तर भारताला या विश्वचषक स्पर्धेचे संभावित विजेते म्हणून गणण्यास सुरुवात केली. असं सर्व मनासारखं घडत असताना खेळाडूंनाही उंच मनोबलाने विश्वचषकात खेळताना उत्साहवर्धक नक्कीच वाटत असेल.
क्रिकेटमधील वरिष्ठ पुरूष संघाची शानदार कामगिरी बघून महिला क्रिकेट संघालाही नवसंजिवनी मिळाली असल्याचे दिसत आहे. भारताच्या महिलांनी चिनमध्ये सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रिडा स्पर्धेत सरस कामगिरी करून प्रथमच सुवर्ण पदकांचा वेध घेतला असून नवोदित पुरूष संघही हा लेख लिहीला जाईपर्यंत उपांत्य फेरीत पोहोचला होता. कदाचित ते सुध्दा सुवर्णपदक जिंकतील. या सर्व सकारात्मक बाबी आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने संघाचा आत्मविश्वास व मनोधैर्य वाढविण्यात बुस्टर डोसचे काम करतील व मागील दहा वर्ष हुलकावणी देणारे आयसीसी स्पर्धांचे विजेते पद मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावतील.
आयसीसीच्या तिनही प्रारूपात अव्वल मानांकन व विश्वजेतेपद एकाच कालखंडात टिम इंडियाकडे आल्यास भारत खऱ्या अर्थाने क्रिकेटची महासत्ता बनेल. परंतु मायदेशात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळताना भारतीय संघाला नऊ मातब्बर संघ व भारतीय जनतेच्या मोठया अपेक्षांचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही बाबींचे मायावी इंद्रधनुष्य टिम इंडियाला पेलवेल का ? हा लाख मोलाचा प्रश्न मात्र विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत गुलदस्त्यात्यातच राहणार आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

