*चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील नजन वस्ती येथे बिबट्याच्या हल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकाराने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परीसरात तातडीने पिंजरा लावून या बिबट्याच्या मादीला व बछड्याला जेरबंद करावे अशी मागणी परीसरातून केली जात आहे.
भोकर परीसरात तसा बिबट्याच्या मादीचा, बिबट्याचा व बछड्याचा नित्याचाच वावर आहे. येन केन प्रकारे अनेकदा परीसरातील शेतकरी महिलांसह मजूरांना व शेतकर्यांना या बिबट्याच्या मादीचे, बछड्याचे व बिबट्याचे कधी स्वतंत्र तर कधी समुहाने दर्शन होत आहे. त्यातच या बिबट्याने परीसरातील अनेक शेतकर्यांचे पाळीव कुत्र्यांसह दुभत्या जनावरांवर हल्ला चढवत शेळ्या, बोकड व कालवडी फस्त केल्याचे सर्वश्रूत आहे.
त्यातच काल मंगळवार दि.३ आक्टेाबर रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भोकर शिवारातील भोकर - वडाळा महादेव रोडलगत गट नं.२४५ मध्ये वस्ती करून राहत असलेले रावसाहेब लक्ष्मण नजन यांच्या वस्तीवर चाल करून जात या बिबट्याने त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढविला. त्यात एक शेळी गंभीर जखमी झाली तर दोन शेळ्याचा मृत्यू झाला. यातील एका शेळीचा मृतदेह नजन यांच्या वस्तीपासून दिडहजार फुटावर असलेल्या ऊसाच्या शेतात आढळला मात्र आदल्या दिवशी झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी असल्याने व त्यातच ओढ्याला आलेल्या पुरातून या बिबट्याने एक शेळी ओढ्याच्या पलीकडे पाण्यातून नेल्याने दुसर्या शेळीचा मृतदेह सापडलेला नव्हता. हा प्रकार पहाटे स्वत: रावसाहेब नजन व त्याच्या कुटूंबियांनी बघीतल्याने या वस्तीवर बिबट्याच्या दहशतीचे मोठं सावट लहान मोठ्यांच्या चेहर्यावर दिसत होते.
या बाबत स्थानीक वनरक्षकांचा वेळेत संपर्क न झाल्याने काही मान्यवरांनी विभागीय वनसंरक्षण अधिकारी प्रतिभाताई पाटील सोनवणे यांचेशी संपर्क केल्याने दुपारनंतर खर्या अर्थाने या नजन कुटूंबियांना शासकीय आधार मिळाला. काल दुपारी वनविभागाचे गोरक्षनाथ सुरासे यांनी नजन वस्ती येथे समक्ष भेट देवून पंचनामा करून या कुटूबांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात या कुटूंबाचे सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे.
या परीसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे अशी मागणी परीसरातील शेतकर्यांकडून होत आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

