श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवार दिनांक २ आक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ.सुनीताताई गायकवाड यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सौ.सुनीताताई गायकवाड म्हणाल्या की, गांधींजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले.
आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा त्यांचे मनावर परिणाम होता. तसेच त्यांनी लालबहादूर शास्त्री यांचे जीवनकार्य सांगितले. त्या म्हणाल्या की, लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून १९६४ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तान) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील सर्व परीसराची स्वच्छता केली, तसेच मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत माती संवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी परीक्षा अधिकारी प्रा.दिलीप खंडागळे, उपप्राचार्य सुयोग थोरात, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्नील लांडगे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.राणी पटारे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा.संगीता खंडिझोड, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111

