घरातील महिला निरोगी असल्यास कुटुंब आनंदित राहते : मंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर पंचायत समितीकडून महिलांना सामान्य प्रसूतीचे मार्गदर्शन : 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
इंदापूर : इंदापूर पंचायत समिती व आरोग्य विभाग चांगले काम करत असून, आज महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या सामान्य प्रसूती कार्यशाळेत, डॉ. अमोल खानवरे आणि डॉ. सचिन तोरवे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक घरामध्ये स्त्री जर निरोगी असली तर ते घर निश्चित प्रकारे घर आनंदी असते. असे प्रतिपादन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील गुरुकृपा सांस्कृतिक मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त, शनिवार ( दि. 8 मार्च ) रोजी, इंदापूर पंचायत समितीकडून शेस फंडातून, महिलांना सामान्य प्रसूतीचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ व डॉक्टर आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महिलांना नॉर्मल डिलिव्हरी बाबत मार्गदर्शन करताय ही आनंदाची बाब आहे. दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यास किती खर्च होतो. आपल्याला ते महागात पडते. त्या महिला बहिणीला किती त्रास होतो, याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे दोन डॉक्टर तुम्हा सर्वांना त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. छोट्या छोट्या टिप्स आपण पाळल्या तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.
चौकट : शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पंचायत समिती अग्रेसर
इंदापूर पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये, विविध उपक्रम राबविण्यात आले असून, पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील हजारो नागरिकांचा फायदा होत आहे. शासनाच्या विविध योजना, विविध मार्गदर्शन कार्यशाळा राबविल्या जात असून, तळागाळातील नागरिक याचा लाभ घेत आहेत. या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये इंदापूर पंचायत समिती अग्रेसर ठरली आहे.