सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, पैशाच्या जोरावर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका वाळूमाफियाने अवैध वाळू विक्रीतून कमावलेल्या हजारो रुपयांच्या बंडल्ससह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर "बाप तो बाप रहेगा" अशा म्युझिक टोनसह व्हायरल केला. या प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाढती दहशत
सेनगांव तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून बन, बरडा, ब्रम्हवाडी, हूडी लिबाळा, बोडखा, चिखलागर यांसह अनेक ठिकाणी रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू आहे. ३० ते ४० टिप्परद्वारे रोजच्या रोज वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सध्या राज्यभर वाळू उपशावर कठोर बंदी असतानाही सेनगांव तालुक्यात हे बेकायदेशीर कृत्य खुलेआम सुरू आहे. महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, "अशा माफियांना अभय कोणाचे?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर दहशतीचा डाव
भाऊ राठोड नामक व्यक्तीने अंगभर सोनं घालून, टेबलावर हजारोंच्या नोटांची बंडल्स ठेवून रिल्स बनवल्या आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या. या रिल्सद्वारे सामान्य जनतेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी — कठोर कारवाई करा!
सेनगांव तालुक्यात वाढत्या वाळू माफियांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
लोकांनी प्रशासनाकडे "या माफियांवर तातडीने कठोर कारवाई करा!" अशी मागणी केली आहे.
आता या प्रकरणावर पोलीस अधीक्षक कोकाटे काय भूमिका घेणार आणि कारवाई होणार का — याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.