प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी
केज शहर आणि तालुक्यातील विविध भागांमध्ये शासकीय रस्त्यांची कामे सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम वापरला जात आहे. मात्र, या मुरूम उत्खननाचा महसूल (रॉयल्टी) तहसील कार्यालयाला भरला जातो का, याबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.
तालुक्यातील शासकीय गायरान जमिनींमधून रात्री-अपरात्री मुरूम उकरला जात असल्याची माहिती समोर येत आहे. महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
धारूर रोड भागात "प्लॉटिंग"च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मुरूम काढला जात असून, त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या पोल शिफ्ट करून अंडरग्राउंड लाईट टाकण्याचे काम विनापरवाना सुरू असल्याची चर्चा आहे.
जनतेच्या मते, तहसील कार्यालय आणि महावितरण याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी याची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
– केज तालुक्यातील जनतेतून प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी जोरदारपणे पुढे येत आहे