shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घ्या समजून राजे हो...हा देश भारतीयांचाच भारत राहावा यासाठी प्रयत्नशील राहूया..!

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर एक पोस्ट पाहण्यात आली. त्या पोस्टमध्ये तामिळनाडूतील चेन्नई शहरातील मद्रास विद्यापीठात होणाऱ्या एका व्याख्यानामालेची पत्रिका जोडली होती. त्या पत्रिकेत होणाऱ्या व्याख्यानाचा विषय होता "भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार कसा वाढवता येईल?" वक्ताही कोणीतरी दक्षिणेतील ख्रिस्ती व्यक्तिमत्व असावे असा अंदाज येत होता. या समारंभाला चेन्नईच्याच हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आणि आंदोलन करण्याची धमकी दिल्यामुळे हे व्याख्यान रद्द करण्यात आल्याची माहिती देखील नंतर मिळाली. 

या निमित्ताने माझ्या मनात अनेक प्रश्न घोंगावत आहेत. तेच आज या लेखाच्या माध्यमातून मी वाचकांसमोर मांडणार आहे. 

प्राचीन काळापासून भारत हा हिंदूंचा देश म्हणूनच ओळखला गेला आहे. मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वी या देशात फक्त सनातन धर्म म्हणजेच आजचा हिंदू धर्म अस्तित्वात होता, आणि इथे राहणारे सर्व नागरिक हा सनातन धर्म मानणारे होते. साधारणपणे आठव्या नवव्या शतकापासून या देशावर मुस्लिमांनी आक्रमण करणे सुरू केले. हळूहळू त्यावेळी इथे वेगवेगळी संस्थाने होती. प्रत्येक संस्थानिक हा स्वतंत्र राजा होता. त्यांच्यात सर्वच ठिकाणी   संघर्ष होत होते. प्रत्येक राजा समोरच्या राजावर कुरघोडी करु बघत होता.त्यामुळे त्यांच्यातल्या फुटीचा फायदा घेत मुस्लिमांनी हळूहळू या देशावर आपले साम्राज्य वसवले. त्यावेळी मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर इथल्या अनेक हिंदूंना बळजबरीने बाटवून मुस्लिम केले. 

मुस्लिमांच्या साम्राज्याला आधी मध्य भारतात राजपुतांनी आव्हान दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आव्हान देत मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, नंतर राजाराम महाराज आणि नंतरच्या काळात पेशव्यांनी मराठ्यांचा जरीपटका थेट अटकेपार नेला होता. तरीही या काळात या देशातील औरंगजेबासारखे मुस्लिम राजे देशात बळजबरीने हिंदूंना मुस्लिम बनवत होतेच. त्यामुळे त्या काळात बहुसंख्य हिंदू तलवारीच्या जोरावर मुस्लिम बनवले गेले असे इतिहास सांगतो. या काळात मुस्लिमांनी हिंदूंची अनेक धर्मस्थळे आणि मंदिरेही फोडली आणि तिथे मशिदी बनवल्या असेही इतिहासात नोंदले गेले आहे.  बाबरी मशीदचे उदाहरण सध्या ताजे आहे. तुमचे देव आम्ही फोडतो. ज्या देवाला तुम्ही रक्षणासाठी भाकता, तो देव स्वतःचेच रक्षण करू शकत नाही, तो तुमचे काय करणार? असेही मुस्लिम सरदार सांगायचे.

साधारणपणे १३व्या, १४व्या शतकात भारतात इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यांनी हळूहळू आपला जम बसवला आणि व्यापार करता करता ते राज्य देखील करू लागले. देशातील सर्व हिंदू आणि मुस्लिम राजांना आणि त्यांच्या संस्थानांना इंग्रजांनी खालसा केले आणि संपूर्ण भारतात आपले साम्राज्य बनवले.

इंग्रज भारतात आले ते दक्षिणेकडून. त्यांनी सुरुवातीला व्यापार करता करता तिथेही आपला धर्म कसा प्रस्थापित करता येईल याचाच प्रयत्न केला. मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर बळजबरीने हिंदूंना मुस्लिम केले होते. इंग्रजांनी मात्र दक्षिणेतील जनसामान्यांच्या गरिबीचा फायदा उचलत त्यांना प्रलोभने दाखवून आणि त्यांचा बुद्धीभ्रम करून त्यांना बाटवून ख्रिश्चन बनवले. त्या काळात दक्षिणेत दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडत होता. त्याचबरोबर विविध रोगांच्या साथी देखील येत होत्या. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी तिथे आपला जम बसवला. दुष्काळात दुष्काळग्रस्त नागरिकांना अन्नधान्य पुरवले तर साथीच्या रोगात औषधोपचार विनामूल्य देत त्यांना आपल्या बाजूने वळवले. इंग्रजांनी सुरुवातीला तिथे आपली चर्चेस स्थापन केली. त्याच्या माध्यमातून ते भोळ्या भाबड्या गरीब जनतेला आकाशातल्या बापाचे महत्त्व समजावून देऊ लागले. त्यासाठी हे आलेले ख्रिश्चन मिशनरी स्थानिक भाषा सुद्धा शिकले आणि सफाईने बोलूही लागले. स्थानिक 
 भाषेत ते या गोरगरिबांना ज्ञान देऊ लागले. त्या काळात ख्रिश्चन लोक खायचे तो  पाव(ब्रेडचा प्रकार) हिंदूंकडे निषिद्ध मानला जायचा.ख्रिस्ती मिशनरी रात्री चोरून गावातल्या विहिरीत तो पाव टाकायचे, आणि पाव असलेले पाणी तुम्ही प्यालात म्हणजे तुम्ही आता ख्रिस्ती झालात असे सांगून अनेक भोळ्या भाबड्यांना त्यावेळी ख्रिस्ती बनवले गेले, अशाही नोंदी इतिहासात सापडतात.

त्या काळात या भागातही सनातन धर्माचाच प्रभाव होता. सनातनी धर्मात वेदविद्यांना आणि संस्कृत ऋचांनाही महत्त्व होते. त्यामुळे या संस्कृत ऋचांमधूनच या भोळ्या भाबड्या जनतेला आपण वश करू शकू हे या ख्रिस्ती मिशनरींनी ताडले. त्यांनी बायबल मधील तत्वे संस्कृत भाषेत ऋचांच्या धर्तीवर बनवून घेतले आणि वेदातील ऋचा ज्या पद्धतीने तालासुरात म्हटल्या जात असत, त्याच पद्धतीने या बायबल मधील ऋचा या भोळ्या भाबड्या जनतेला शिकवायला सुरुवात केली. मी देत असलेली ही माहिती कपोलकल्पित नसून ज्येष्ठ अभ्यासक स्व. डॉ. नि. र.वऱ्हाडपांडे यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये दिलेली आहे. या पद्धतीने त्यांनी देशाच्या दक्षिण आणि पूर्व भागात नंतर ईशान्य भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, हळूहळू देशाच्या सर्वच भागांमध्ये हे ख्रिस्ती मिशनरी पाय पसरू लागले. आज देशात कुठेही जा, जसे मंदिर दिसते, तसेच चर्चही दिसते, आणि मशिदही दिसते. इतका या दोन्ही धर्माच्या धर्मप्रसाराकांनी आपल्या धर्माचा या देशात प्रसार केला आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात जे सरकार आले, ते सरकारही दुर्दैवाने मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्जिणेच होते.परिणामी या देशात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मुस्लिमांना भरपूर सवलती दिल्या गेल्या. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात हिंदू बौद्ध शीख पारशी इंग्रज ख्रिस्ती आणि मुस्लिम इतके प्रमुख धर्म होते. मात्र या सर्व धर्मांसाठी वेगवेगळे कायदे होते. त्यातही मुस्लिमांना त्यांच्या शरियत कायद्यानुसार विशेष सवलती दिल्या जात होत्या. त्या काळात देशात द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला होता. त्यानुसार एक पत्नी किंवा एक पती हयात असताना रीतसर घटस्फोट न घेता दुसरे लग्न करता येत नव्हते. तो दखलपात्र गुन्हा ठरत होता. मात्र मुस्लिमांना यातून सूट होती. देशात कुटुंब नियोजनाचा कायदा लागू झाला मात्र मुस्लिमांना त्यातूनही सूट मिळाली. परिणामी मुस्लिम पुरुष कितीही लग्न करू शकत होता, आणि कितीही अपत्य जन्माला घालू शकत होता. जबरीने धर्मांतर हा गुन्हा ठरवण्यात आला होता. मात्र मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी जबरीने केलेले धर्मांतर दुर्लक्षित ठेवले जात होते. परिणामी या दोन्ही धर्मांचे धर्मप्रसारक मोठ्या प्रमाणात आपापला धर्म वाढवत होते. 

याचाच परिणाम म्हणजे १९५१ च्या जनगणनेनुसार देशात मुस्लिम आणि ख्रिश्चनांची जी संख्या होती, त्यात आज झपाट्याने जबरदस्त वाढ झाली आहे. आज मुस्लिमांना हा देश मुस्लिम म्हणून घोषित करून घ्यायचा आहे, तर ख्रिश्चनांचे धर्मस्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटी ने पुढील २५ वर्षात संपूर्ण भारत ख्रिस्तमय व्हायला हवा असे टार्गेटच दिले असल्याची माहिती आहे. त्यातूनच मग मद्रास विद्यापीठात अशा प्रकारची व्याख्याने आयोजित करण्याचे प्रकार बिनबोभाट घडत आहेत. 

आधी नमूद केल्यानुसार इंग्रज या देशात दक्षिणेतून आले. त्यांनी आपला धर्मप्रसार दक्षिणेत जास्त वेगाने केला. त्यामुळेच आज दक्षिणेत ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात आहे. तिथली सामाजिक स्थिती बघितली तर तिथले नागरिक देशाची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीला काहीही महत्त्व देत नाहीत. त्या तुलनेत तिथला सामान्य माणूसही इंग्रजीला जास्त महत्त्व देतो असे दिसून आले आहे. इतकेच काय तर तिथले सत्ताधारी देखील हिंदीचा विरोधच करत असल्याचे पुन्हा एकदा आता स्पष्ट झाले आहे. दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्र या राज्यांमध्ये आजही इंग्रजीचाच प्रभाव जास्त आहे. तसाच या प्रदेशात ख्रिस्ती संस्कृतीचाच प्रभाव जास्त आहे. तिरुपतीचा बालाजी हे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. आपल्या देशात  स्वातंत्र्यानंतर सर्व मंदिरांवर शासकीय प्रशासक बसवले गेले. मात्र ख्रिस्ती चर्चेस आणि मुस्लिम मशिदी यांना त्यातून सूट दिली गेली. तिरुपतीच्या बालाजी मंदिरावर शासकीय प्रशासक आहे. काही वर्षांपूर्वी तिथे मुख्य प्रशासकीय अधिकारी एका ख्रिस्ती व्यक्तीला नेमले अशी बातमी आली होती. असे प्रकार फक्त दक्षिणेतच नाही तर मधल्या काळात देशात ठिकठिकाणी घडत होते. दक्षिणेत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे. त्यामुळेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री हिंदी भाषेला विरोध करतात. तिथला सामान्य माणूस देखील त्याच मानसिकतेत आहे. 

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आजही या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन आपला धर्मप्रसार करून आपली लोकसंख्या कशी वाढवावी आणि हा देश मुस्लिम किंवा ख्रिश्चन कसा बनवता यावा या दृष्टीने प्रयत्नशील आहेत हे स्पष्ट होते. दुर्दैवाने आतापर्यंत देशात काँग्रेसचे राज्य होते. आणि त्यांचे देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पर्यायाने अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचेच धोरण होते. मात्र आता २०१४ पासून देशात हिंदुत्वाचा विचार करणारे सरकार सत्तेत आले आहे. अर्थात हे सरकार इतर धर्मावर अन्याय करते असा प्रकार होत नाही. नरेंद्र मोदींच्या कालखंडातच मुस्लिम आक्रमणकारी बादशहा बाबर याच्या सरदाराने जमीनदोस्त केलेले अयोध्येचे राम मंदिर आणि तिथे बांधलेली बाबरी मशीद हा इतिहास पुसला जाऊन बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. देशात समान नागरी कायदा येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तसेच झाले तर मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना चाप बसणार आहे हे नक्की. 

याचवेळी देशातील सर्वसामान्य नागरिकांनी देखील सजग राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक आज अशा छुप्या पद्धतीने धर्मप्रसार करू बघत आहेत. त्याला सामाजिक दृष्ट्या पायबंद कसा घालता येईल याचा विचार व्हायला हवा. आज गेल्या अनेक वर्षांचा इतिहास बघितला तर अनेक धर्मपरिवर्तित मुस्लिम आणि ख्रिश्चन हे आधी हिंदूच होते हे दिसून येते. त्यामुळे त्यातल्या अनेकांनी धर्म बदलला तरी त्यांची जीवनशैली हिंदू पद्धतीचीच राहिलेली आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अनेक ख्रिस्ती आणि मुस्लिम कुटुंब हे मराठी संस्कृतीची जपणूक करताना दिसतात. त्यांची भाषा मराठीच आहे. मराठी संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. यु.म. पठाण किंवा मराठी संस्कृतीचे अभ्यासक आणि साहित्यिक रेव्हरंड नारायण टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, तसेच त्यांचा मुलगा रेव्हरंड देवदत्त टिळक यांची उदाहरणे देता येतील. अजूनही अनेक उदाहरणे आहेत. मात्र जागेअभावी ती सांगता येणार नाहीत. अशी अनेक धर्मांतरित कुटुंबे आज आपलीच संस्कृती जपत आहेत. फक्त आपल्या भाषेत आपल्या देवाची स्तोत्रे न म्हणता ते आपल्या अल्लाची किंवा आकाशातल्या बापाची स्तोत्र म्हणतात, इतकाच काय तो फरक. 

आज हिंदू धर्मातून परधर्मात प्रवेश करण्यासाठी आजही ठीक ठिकाणी मोठी प्रलोभने दाखवली जातात अशी माहिती मिळते. समाजाने अशा प्रकारांवरही रोख कसा लावता येईल हा प्रयत्न करायला हवा. ख्रिश्चनांनी आदिवासी भागात आपले पाय पसरले आहेत. आज वनवासी कल्याण आश्रम सारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटना तिथे काम करताना दिसत आहेत. त्यांना पाठबळ कसे मिळेल हे समाजाने बघणे गरजेचे आहे. 

त्याचबरोबर शासकीय स्तरावर मुस्लिम किंवा ख्रिश्चनांचे होणारे लांगुलचालन कसे थांबवता येईल या दृष्टीनेही समाजानेच सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. त्यासाठी या देशात समान नागरी कायदा येणे अत्यावश्यक आहे. इतरही कायद्यांमध्ये बदल व्हायला हवेत. वक्फ कायद्यासारखे कायदे किंवा फक्त मंदिरांवर सरकारी नियंत्रण हे प्रकार बंद करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवायला हवा. समान नागरी कायदा आला तर सर्वांनाच एक पत्नी कायदा लागू होईल आणि सर्वच हम दो हमारे दो च्या कक्षेत येतील. त्यामुळे काही धर्माच्या वाढत्या लोकसंख्येवरआपसुकच नियंत्रण येईल. 

त्याचबरोबर अशा प्रकारे चित्रपट, नाटक, व्याख्यान, लेखन, समाज माध्यमे या प्रकारातून जनसामान्यांचे बुद्धिभ्रम करण्याचे प्रकारही हाणून पाडायला हवेत. इथे चेन्नईतील संघटनांचे अभिनंदन करायला हवे, की त्यांनी भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार कसा होईल या विषयावरील विद्यापीठात होणाऱ्या व्याख्यानाचा प्रकार हाणून पाडला. असेच सर्वच स्तरावर जनसामान्यांनी सजग होऊन पावले उचलायला हवीत. तसे झाले तरच भारतातील मूळ भारतीय आपली धार्मिक संस्कृती आणि सभ्यता जपून पुढे जातील आणि आजचा हा भारत देश भविष्यातही भारत म्हणूनच ओळखला जाईल. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे...?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो....
close