सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांचा विज अधिकाऱ्यांना घेराव आंदोलनाचा इशारा
श्रीरामपुर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये वीजेचा खेळ खंडोबा झाला असून सुरळीत वीज पुरवठा न होता अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही.
या विजेच्या अनियमिततेचा पुरवठा व बिबट्याची भीती पोटी शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव आंदोलन घालण्याचा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सध्या शेतामध्ये ऊस, कांदा,मका, फळबागा व इतर पिके असून विजेच्या लपंडावाने व कमी दाबाच्या विजेमुळे शेतकऱ्यांचे भरणे होत नसून शेतकरी त्रासला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शेतीला पाणी देण्यासाठी उभा आहे. परंतु वीज वितरणाच्या अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. शेतकऱ्यास पिके वाचवण्याची काळजी लागली आहे. त्यामुळे वीज वितरणाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच ग्रामीण भागातील काही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असून त्यामधील ऑईल बदलणे, इतर दुरुस्ती करून चांगल्या दाबाने वीजपुरवठा करावा, सदरची कामे महावितरण विभागाने जलद गतीने त्वरित करून द्यावी.वेळ गेल्यानंतर शेतकऱ्यांवर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी वीज वितरण विभागाने त्वरित कार्यवाही करावी. श्रीरामपूर तालुक्यासाठी जे नवीन सबस्टेशन २२० / ३३ के.व्ही. अति उच्चदाब मंजूर झालेले असून त्याचे काम लवकर सुरू करावे, शेतकऱ्यांच्या विजे संदर्भात विविध मागण्या असून पूर्ण न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालण्यात येईल असा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111