जत (प्रतिनिधी):
जत शहरातील स्वच्छतेच्या वास्तविक स्थितीची भीषणता लपवण्यासाठी स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या नावाखाली जत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून बोगस सर्वेक्षण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाला विरोध करत माजी नगरसेवक परशुराम(भैय्या)मोरे यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ जाब विचारला आणि या बोगस सर्वेक्षणाला विरोध दर्शवला.या घटनेच्या वेळी विक्रम ढोणे,गोपाल पाथरूट, संदीप पाथरूट,गौतम ऐवळे,महेबुब शेख, सुनील पाथरूट,कुमार पाथरूट यांच्यासह शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने बोगस सर्वेक्षणाचा निषेध करत शहराच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला.
जत शहरातील शिर्के गल्ली परिसरात सर्वेक्षणाच्या नावाखाली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना स्वतःच कचऱ्याच्या बकेट हातात घेऊन फोटो काढण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. स्वच्छतेचा आभास निर्माण करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप परशुराम मोरे यांनी केला.त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे करून प्रभागातील नागरिकांचा रोष व्यक्त केला.शहरातील वास्तविक स्थितीवर झाक घालण्यासाठी चाललेल्या या बोगस सर्वेक्षणावर प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
शहरातील गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या गटारींची दयनीय अवस्था पाहून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने आणि गटारी स्वच्छ न केल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांनी यावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शहरातील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे फोटो काढून शासनासमोर खरे चित्र सादर करण्यास भाग पाडले.
मोरे यांची मागणी:
"शहरातील स्वच्छतेची खरी परिस्थिती प्रशासनासमोर मांडली जावी. बनावट फोटो दाखवून स्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होऊ नये," अशी ठाम भूमिका परशुराम मोरे यांनी घेतली. त्यांनी प्रशासनाला यासंदर्भात तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह:
जत शहरात स्वच्छतेची दयनीय स्थिती लक्षात घेता, स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

