देहरे : प्रतिनिधी -नीरज जेठे : देहरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. कल्याणीताई मेघनाथ धनवटे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. गावच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळावे, या हेतूने ग्रामस्थांनी एकमताने त्यांना ही संधी दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. धनवटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. गावातील सर्वपक्षीय सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, हे विशेष! निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सौ. धनवटे म्हणाल्या, "ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असेल. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन."
या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या वेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
गावाच्या विकासासाठी नवीन संधी आणि आधुनिक योजना राबवण्याचा निर्धार सौ. धनवटे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.