shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई आणी अबीतखिंड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपती पुरस्कार विजेते रामचंद्र भोजने यांचा भव्य सत्कार..!

ढोल-ताशांच्या गजरात भोजने यांची
भव्य मिरवणूक; ग्रामस्थांचा जल्लोष

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या प्रेरणादायी विचारांचे भैरवनाथ सेवा मंडळाकडून कौतुक

अकोले / प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील अबीतखिंड येथील सुपुत्र व बायोगॅस प्रकल्प निर्माते रामचंद्र गणपत भोजने यांनी बायोगॅस प्रकल्प उभारून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल अकोले तालुक्यातील अबीतखिंड येथील ग्रामस्थ आणि सह्याद्री आदिवासी सेवा संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली (मुंबई विभाग) यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग घेत पुर्ण गाव या कार्यक्रमात सामील झालं. श्री.भोजने यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात, लेझीम आणि ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक फिरल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये सर्वश्री यमाजी लहामटे (सभापती) डॉ. विश्वासराव आरोटे (दैनिक समर्थ गांवकरी चे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस) प्रमोद मोरे (सामाजिक निसर्ग पर्यावरण महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष) नितीन गिरी (आदिवासी सोसायटीचे चेअरमन) जानकीराम गोडे (सोसायटी चेअरमन) यमुना घनकुटे (सरपंच) कृषी सहाय्यक पवार, ग्रामविकास अधिकारी सुकटे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक फापाळे सर यांनी भूषविले.

डॉ. आरोटे यांचे प्रेरणादायी विचार
या कार्यक्रमात बोलताना डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "राष्ट्रपती पुरस्कार हा मोठा सन्मान असला तरी गावकऱ्यांनी दिलेला मान हा खूप मोठा असतो. व्यक्तीने मोठ्या शहरांमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवला तरी गावच्या मातीतून मिळणारा सन्मान वेगळाच असतो. मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण जिद्द, ध्यास आणि चिकाटीने मी आज संपादक झालो आहे. त्यामुळे आपल्या कामात सातत्य व प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही."

तसेच त्यांनी भैरवनाथ सेवा मंडळ, मुंबई व रामनाथ भोजने यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “अशा कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी हुरूप मिळतो.”

प्रमोद मोरे यांचे चंदन शेतीला प्रोत्साहन:
प्रमोद मोरे यांनी आपल्या भाषणात चंदन शेतीबाबत जागरूकता निर्माण केली. त्यांनी सांगितले, “शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत चंदन शेतीकडे वळावे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल तसेच पर्यावरण संतुलनास मदत होईल. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ.”

त्यांना मा. सभापती यमाजी लहामटे यांनी देखील पाठिंबा देत शेतकऱ्यांनी चंदन शेतीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

गावातील मान्यवरांचा व महिलांचा सन्मान:
कार्यक्रमात फक्त रामचंद्र भोजने यांचाच नव्हे तर गावातील इतर मान्यवरांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मा. यमाजी लहामटे, डॉ. विश्वासराव आरोटे, प्रमोद मोरे, नितीन गिरी, जानकीराम गोडे, यमुना घनकुटे, कृषी सहाय्यक पवार, ग्रामविकास अधिकारी सुकटे, शांताराम घनकुटे, विजय घनकुटे आणि ओंकार भारमल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिलांसाठी कौटुंबिक साहित्याचे वितरण देखील करण्यात आले. महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते.

रामनाथ भोजने यांची कौतुकास्पद भूमिका:
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये भैरवनाथ सेवा मंडळ, मुंबई चे अध्यक्ष रामनाथ भोजने यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनीच या कार्यक्रमाची संकल्पना मांडून, गावकऱ्यांना एकत्रित करत उत्साहात साजरा केला.

स्नेहभोजनाने सांगता:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील रामनाथ भोजने यांनीच केले. दीपक राऊत यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमामुळे अबीतखिंड गावामध्ये अभिमानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रामचंद्र भोजने यांच्या यशामुळे संपूर्ण परिसरात प्रेरणादायी ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा आणि यशाचा आदर्श ठेवत नव्या पिढीला सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

वृत्त विशेष सहयोग
अशोकराव शेळके - कोतुळ 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close