shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंजाबच्या विजयाचे श्रेय अय्यरच्या कप्तानी खेळीला....!

             पंजाब किंग्जचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलच्या  अठराव्या मोसमाची दमदार सुरुवात केली आहे.  मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो शतकाच्या जवळ आला होता पण तीन धावांनी ते हुकले.  याचे कारण होते पंजाबचा फलंदाज शशांक सिंग, ज्याने फ्रँचायझी सोबत पदार्पण करताना आपल्या कर्णधाराला शतक झळकविण्याचा विक्रम करू दिला नाही. अय्यर प्रथमच पंजाबकडून आयपीएल खेळत आहे.  त्याच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या वर्षी विजेतेपद पटकविले, परंतु त्याला कायम ठेवण्यात आले नाही आणि लिलावातही खरेदी करता आले नाही.  अय्यरला पंजाबने विकत घेतले आणि या फलंदाजाने पदार्पणातच आश्चर्यकारक विजयी कामगिरी केली. पंजाबच्या डावाचे शेवटचे षटक बाकी असताना अय्यर शतकापासून तीन धावा दूर होता.  पहिल्याच चेंडूवर शशांक सिंगला स्ट्राईक मिळाली.  शशांक कर्णधाराला शतक पूर्ण करण्याची संधी देईल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याने तसे केले नाही.  शशांकने या षटकात चार चौकार मारले.  अय्यरने ४२ चेंडूत नऊ षटकार आणि पाच चौकारांसह ९७ धावा केल्या.

                 शशांकने १६ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या.   त्याने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि २० व्या षटकात स्ट्राइक ठेवली.  त्याला हवे असते तर तो कर्णधाराला हा स्ट्राईक देऊ शकला असता, पण त्याने संघाचे हित सर्वोपरि ठेवले आणि धावा देणाऱ्या चेंडूंवर चौकार मारून संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.


                 अय्यर आणि शशांकच्या खेळीच्या जोरावर पंजाबने मजबूत धावसंख्या उभारली आहे.  त्यांनी २० षटकांत ५ बाद २४३ धावा केल्या.  अय्यर आणि शशांक व्यतिरिक्त सलामीवीर प्रियांश आर्यने आपला पहिला आयपीएल सामना खेळताना २३ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या.  मार्कस स्टॉइनिसने १५ चेंडूत २० धावा केल्या.  ग्लेन मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. याबरोबरच आयपीएलमध्ये सर्वाधिक १९ वेळा शुन्यावर बाद होण्याचा दुर्देवी विक्रम त्याच्या नावे लागला. आता या बाबतीत त्याने रोहित शर्मा व दिनेश कार्तिकला मागे सोडले.

                     पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विद्यमान आयपीएल सत्रातील हा पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा अकरा धावांनी पराभव करत विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली.  प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित २० षटकात ५ बाद २३२ धावाच करता आल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने ७४ धावांची झुंजार खेळी केली. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक जोस बटलरने ३३ चेंडूत ५४ धावा केल्या, मात्र असे असतानाही गुजरात संघाला विजय मिळवता आला नाही.  सामन्यात पंजाब किंग्जच्या विजयानंतर,  गुणतालिकेत मोठा फेरबदल दिसून आला. सध्या सनरायझर्स हैदराबाद संघ अव्वल स्थानावर आहे.  हैदराबादने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला होता.  या विजयानंतर हैदराबाद २ गुण आणि + २.२०० निव्वळ रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.


                     आरसीबीने पहिल्या सामन्यात गतविजेत्या केकेआरचा सात गडी राखून पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.  आरसीबी एक सामना जिंकून आणि + २.१३७या निव्वळ धावगतीसह दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे पंजाब किंग्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरातचा अकरा धावांनी पराभव करून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळविले. पंजाबने चेन्नईला चौथ्या स्थानावर ढकलले आणि ०.५५० च्या निव्वळ धावगतीसह तिसरे स्थान मिळविले. सीएसके चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे २ गुण आणि + ०.४९३ इतका निव्वळ रन रेट होता.  त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबईचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघ 2 गुण आणि + ०. ३७१ निव्वळ धावगतीसह पाचव्या स्थानावर आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने लखनौचा एकगडी राखून पराभव केला. लखनौ गुणतालिकेत सहाव्या तर मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पंजाब किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात संघ शुन्य गुण आणि -०.५५० इतक्या निव्वळ धावगतीसह आठव्या स्थानावर आहे. केकेआर आणि राजस्थान संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

                   स्पर्धेची ही सुरुवात असल्याने पहिल्या काही सामन्यात प्रत्येक संघाला आपले संयोजन साधण्यात वेळ जाणार हे उघड असून सुरुवातीच्या पराभवांची भरपाई करण्यास प्रत्येक संघास अजून प्रत्येकी तेरा सामने खेळायचे आहेत. त्यामुळे गुणवान संघ आपली कुवत ओळखून रणनिती आखतील व पुढील मार्गक्रमण करतील.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close