अहिल्यानगर / प्रतिनिधी:
अहिल्यानगर (अहमदनगर) येथून ३४ वर्षाहून अधिक काळ सातत्याने प्रकाशित होणार्या ‘धमाल धमाका’ विनोदी दिवाळी अंकास यंदाचा ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे.
बदलापूर येथील उल्हास प्रभात वृत्तपत्र व न्यूज चॅनलतर्फे राज्यातील विविध भागातून पुरस्कार प्रस्ताव मागविण्यात आले होते. तसेच दिवाळी अंकांचे देखील प्रस्ताव मागविण्यात आले होते. एकूण ५७ पुरस्कारांचा यामध्ये समावेश असून, विशेष पुरस्कार ६ जणांना तर १३ दिवाळी अंकांची व इतर अनेक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक या विभागात अहिल्यानगर येथील नसीर बी. शेख संपादित विनोदी दिवाळी अंक ‘धमाल धमाका’ या दिवाळी अंकास पुरस्कार मिळाला आहे.
बदलापूर येथील काटदरे मंगल कार्यालयात १८ एप्रिल रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
आ.किसन कथोरे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे ‘उल्हास प्रभात’चे संपादक डॉ. गुरुनाथ बनोटे यांनी सांगितले.
धमाल धमाका या विनोदी दिवाळी अंकास मिळालेल्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराबद्दल संपादक नसीर शेख यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9461174111