तात्यांनी.. राहुरी कारखान्याच्या निवडणुकीसाठी खुला प्रचार करण्याचा मला परवाच शब्द दिला..! आप्पासाहेब काळजी करू नका.. तालुक्यात आपले खुप पाहुणे आहेत.. मी त्या सर्वांकडे तुम्हाला घेऊन जातो.. गुहा गावात उऱ्हे पाहुणे आहेत, राहुरीत तनपुरे पाहुणे आहेत.. असे, खुप सारे नातेवाईक कारखान्याचे सभासद आपल्या तालुक्यात आहेत.. तुमच्या सारख्या माणसाची राहुरी कारखान्यात गरज आहे.. तुम्ही संचालक झाल्याशिवाय कारखान्याचे चाक फिरणार नाही..! कामगारांना न्याय मिळणार नाही..! कारखान्यातील चुकीच्या कारभारावर तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अंकुश ठेवू शकणार नाही याचा आम्हा सर्व कामगारांना विश्वास आहे.. त्यामुळेच.. मी, तुमच्यासोबत या वेळेस खुलेआम प्रचार करणार आहे..!
असे सांगून.. राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत मला अर्ज ठेवायला सांगून.., स्वतः मात्र.. या जीवनाच्या सारीपाटातून तात्यांनी अचानक माघार घेतली..!
आमच्या सर्व ढूस परिवारातील लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे तात्या.. म्हणजेच.., ज्यांनी राहुरी कारखान्यामध्ये आपले सर्व आयुष्य रोजंदारी कर्मचारी म्हणून वेचले.. आणि रोजंदारीवरच ज्यांना निवृत्त व्हावे लागले.. याची खंत सतत मनाशी बाळगणारे.. आणि म्हणून की काय.. माझ्यावर खूप प्रेम असलेले.. अत्यंत मितभाषी.. मनमिळावू म्हणून समस्त ढूस परिवारात ज्यांनी नावलौकिक मिळवला.. असे.., आमचे बंधू.. रावसाहेब मारुती ढूस यांचे आज ऱ्हदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले..
आज शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी आमच्या मातोश्री कै. चांगुणाबाई भिमराज ढूस यांचे देवळाली प्रवरा सोसायटीच्या मंगल कार्यालयात प्रथम पुण्यस्मरण (वर्ष श्राद्ध) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. त्यानिमित्त ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यांचे जाहीर हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.. सकाळी ठिक ०९.५४ वाजता.. आम्ही सर्व कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना.. ऐन.. किर्तन सुरू होण्याच्या वेळेला आमचे बंधू रावसाहेब मारुती ढुस यांचे चिरंजीव दौलत याचा मला फोन आला.. किर्तन सुरु होण्याच्या वेळेला दौलतचा फोन येणे हेच मुळी मला शंकास्पद वाटले होते.. कारण.. रावसाहेब तात्या आणि दौलत हे भावकी मधील कोणाचाही कार्यक्रम कधीही चुकवत नसत.. आणि, आज तात्या कार्यक्रमात दिसत नाहीत.. तसेच, दौलतही कार्यक्रमात दिसत नाही. असे असताना दौलतचा फोन आल्यामुळे मनात शंकेची पाल चूक चुकली.. मी तात्काळ फोन कानाला लावून कीर्तनाच्या लाऊड स्पीकर समोरून बाजूला गेलो.. मी फोनवर हॅलो.. बोलण्यापूर्वीच.. दौलतचे कापऱ्या आवाजातील शब्द कानी पडले.., तात्याला खूप कसेतरी होत आहे..! प्रसादला लवकर पाठवा..! आणि, असे बोलून.. दौलत फोनवर रडू लागला.. दौलतचा तो आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.. मी फक्त.. ठीक आहे, घाबरू नको..! प्रसाद पाचच मिनिटात येईल.. असे बोलून समोरच उभ्या असलेला माझा मुलगा प्रसाद याच्याकडे मी धाव घेतली.. तुझ्याकडे गाडी कोणती आहे ?.. असे.. प्रसादला जोरात विचारून.. तात्काळ रावसाहेब तात्याच्या घरी जा..! त्यांना कसे तरी होत आहे..! अर्जंट जा..! आणि मंगल कार्यालयाच्या जवळच असलेल्या.. वीर डॉक्टर कडे घेऊन ये..! मी तिथे पोहोचतो..! असे म्हंटलो.. चिरंजीव प्रसाद यांने कार्यक्रम सोडून थेट गाडीकडे धाव घेतली.. पळतच जाऊन गाडी सुरू केली.. आणि दोनच मिनिटात.. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम सुरू असलेल्या जागेपासून जवळपास हजार फुटांवर राहत असलेल्या दत्त मंदिर जवळील दौलतच्या घरी पोहोचला.. तात्यांना गाडीत घालून तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले.. मात्र.., नियतीने डाव साधला.. आमच्या सर्वांचे आवडते रावसाहेब तात्या दवाखान्यात जाण्यापूर्वीच आम्हा सर्वांना सोडून गेले..! हे जेव्हा माझा मुलगा प्रसाद याच्याकडून मी फोनवर ऐकले.. तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच हलली की काय असा मला भास झाला.. आणि.. मी क्षणात भूतकाळात गेलो..,
परवाच मला रावसाहेब तात्या भेटले.. त्यांनी स्वतःहून माझ्याजवळ राहुरी कारखान्याच्या निवडणुकीचा विषय काढला.. कोणत्याही परिस्थितीत राहुरी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घ्यायची नाही.. हे मला रावसाहेब तात्यांनी ठणकावून सांगितले.. मी स्वतः तुमच्यासोबत प्रचार करेल..! तालुक्यात आपले खूप मतदान आहे.. आमचे सर्व कर्मचारी सुद्धा तुमच्या कारखाना बचाव कृती समितीच्या पाठीशी आहेत..! या कारखान्याचे चाक फिरविण्यासाठी तुमची कारखान्यात गरज आहे..! तुमच्याशिवाय आमच्या कामगारांना न्याय मिळणार नाही..! उच्च न्यायालयात लढा देऊन तुम्हीच या कारखान्याचा लिलाव थांबविला..! आणि निवडणूक लावली..! त्यामुळे तुम्हीच या कारखान्याचे चाक फिरवू शकता.. हा सर्व कामगारांना विश्वास आहे..! दोनच दिवसात आमच्या सर्व कामगारांची आम्ही बैठक घेणार आहोत..! त्यामध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मी सर्वांशी बोलणार आहे..! माझे संपूर्ण आयुष्य रोजंदारी मध्ये गेले..! माझ्यासह असंख्य कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले..! आमच्या कुणीही कामाला आले नाही..! कामगारांवर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे..! आमचे कामगार वाचले पाहिजे.. याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे..! कामगारांची देनी देण्यासाठी तुम्ही काहीतरी नक्की कराल..! याची आम्हाला खात्री आहे..! कारखाना निवडणुकीची अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आपण प्रचाराला सुरूवात करू..! असे मला खात्रीशीरपणे सांगणारे आमचे आवडते तात्या.. मला अर्ज ठेवायला सांगून.. स्वतः मात्र.., या जीवनाच्या सारीपाटातून माघार घेतली..! असे कसे हो तात्या..? अर्ध्यावरती डाव कधी सोडायचा नसतो.. हे मला ठणकावून सांगताना आपण मात्र आम्हाला सोडून गेलात..!
तात्यांच्या हाताला फार चव होती.. मळ्यात कुठेही काही कार्यक्रम असेल तर तात्यांना स्वयंपाक करण्यासाठी अवश्य बोलावले जाई.. स्वयंपाक बनविण्यात तात्यांचा हातखंडा असल्याने ते सर्व दूर परिचित होते.. कारखान्याचे पगार नसतानाही केवळ २० गुंठे जमीन आणि स्वयंपाकातील महारत या जोरावर तात्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये छोटेखानी टुमदार घराचे बांधकाम केले.. दोन्ही मुलींचे लग्न केले.. तात्यांच्या कर्माने त्यांना सोन्यासारखे दोन जावई मिळाले.. मुलगा दौलतचेही नुकतेच लग्न झाले.. त्यामुळे सर्व काही करून तात्यांना आरामाचे दिवस आले असताना नियतीने तात्यांवर घाला घातला आणि तात्यांना आपल्या मधून हिरावून नेले..
माझी आई चांगुनाबाई भिमराज ढूस ज्या पद्धतीने दवाखान्यात जाण्यापूर्वीच पाचच मिनिटात हे जग सोडून गेली.. अगदी त्याच पद्धतीने.. आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आमचे बंधू रावसाहेब मारुती ढूस हेही छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात नेण्यापूर्वी छातीत दुखू लागल्याने पाचच मिनिटात आम्हा सर्वांना सोडून गेले.. याला केवळ योगायोग म्हणावा की, राजकीय अनास्थेमुळे देवळाली प्रवरा मधील पांगळी झालेली वैद्यकीय व्यवस्था जबाबदार आहे असे म्हणावे.. हेच समजेनाचे झाले आहे.. मिनिटा गणित माणसे देवळालीत मरत आहेत.. याचे कोणालाही सोयर सुतक नाही.. आजही माझ्या देवळाली प्रवरा शहरात अद्यावत असे कार्डियाक हॉस्पिटल किंवा ग्रामीण रुग्णालय नाही.. याची खंत त्यामुळे नक्कीच जाणवते..
तात्याच्या जाण्याने आम्ही वर्ष श्राद्ध किर्तन आटोपते घेतले.. मान्यवरांच्या श्रद्धांजलीला फाटा दिला.. सर्वांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील ओम शांती च्या विजया दिदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.. कार्यक्रम आटोपता घेऊन आम्ही दुपारी साडे तीन ते चार वाजता देवळाली प्रवरा येथील अमरधाम येथे तात्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.. तात्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे अंत्य विधीला मोठा जन समुदाय उपस्थीत होता.. सोमवार दिनांक २६ मे रोजी देवळाली प्रवरा येथील खटकळी येथे सकाळी सात वाजता दशक्रिया विधी होणार आहे..
अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू तात्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांचा मुलगा दौलत रावसाहेब ढूस.., पुतण्या.. भाऊसाहेब देवराम ढूस.., अनिल देवराम ढूस.., संजय देवराम ढूस.. याच्यासह समस्त ढूस परिवारावरच नव्हें .. तर उऱ्हे.., तनपुरे आदी परिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. या दुखातून सर्वांना सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो.. अशी विनंती त्या दयाधन परमेश्वर चरणी करतो.. आणि माझ्या आवडत्या तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.. आणि, थांबतो..
रामकृष्ण हरी..!
शब्दांकन
आप्पासाहेब भिमराज ढूस
आंतरराष्ट्रीय खेळाडू.. तथा,
जिल्हा उपाध्यक्ष - प्रहार जनशक्ती पक्ष .. व,
सदस्य - राहुरी कारखाना बचाव कृती समिती