राहुरी - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची झालेली विटंबना प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी क्रांतीसेना व प्रहार कडून करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र मूर्तीची समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या घटनेला आज तब्बल १८ दिवस उलटले असले तरी, अद्यापही या प्रकरणातील दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दि. १४ एप्रिलपासून राहुरीच्या शनी चौकात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या बेमुदत उपोषण आंदोलनाला क्रांतीसेना व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, रमेश खेमनर यांसह शिवप्रेमींनी केली आहे.
शहरातील या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला असून, दोषींना लवकरात लवकर अटक करावी आणि कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे. सदर निवेदनाच्या प्रती दोन्ही उपमुख्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, राहुरी तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाणे राहुरी यांना ईमेल करण्यात आल्या आहेत.